सोलापूर : हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून अज्ञात चोरट्यांनी ३९ हजार रुपये लुटले | पुढारी

सोलापूर : हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून अज्ञात चोरट्यांनी ३९ हजार रुपये लुटले

मोहोळ;पुढारी वृत्तसेवा

हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून, मारहाण करत, दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातील नरखेड रोड उड्डाणपुलाखाली घडली. विश्वराज विकास भोसले ३० वर्षे, (रा. मोहोळ) असे लूट झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वराज भोसले यांचे सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ ते नरखेडला जाणाऱ्या पुलाजवळ शिवराज नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री बारा वाजता भोसले हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून दिवसभर व्यवसायाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम रुपये ३९ हजार रुपये असलेली बॅग व चाव्यांचा जुडगा घेऊन मोटरसायकलने (एम.एच. १३ सी.झेड २९६) नरखेड रोड उड्डाण पुलाखालून सर्विस रस्त्याने मोहोळकडे जात होते.

५ जून रोजी रात्री १ वाजता अचानक एका मोटरसायकल वरून तिघेजण आले, त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यांनी भोसले यांच्या मोटरसायकलीला त्यांची मोटरसायकल आडवी लावली. त्यापैकी एकाने भोसले यांच्या डोळ्यात आणि अंगावर चटणी टाकली. त्यामुळे भोसले खाली पडले. यावेळी त्या तिघांनी भोसले यांना बेदम मारहाण सुरू केली व खिसे तपासून दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्यांनी बॅगेतील चाव्यांचा जुडगा रस्त्यावर फेकून दिला.

डोळ्यात चटणी गेल्यामुळे भोसले आरडाओरड करू लागले. यावेळी याठिकाणाहून जात असणाऱ्या चारचाकीतील काही वाटसरूंनी भोसले यांना काय झाले असे विचारल्यानंतर त्यांनी घडला प्रकाप सांगितला. त्यामुळे त्यांनी तात डीने भोसले यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी विश्वराज भोसले यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत.

वाटमारी व दरोड्याच्या घटना थांबेना, पोलिस प्रशासन कात टाकणार का?

मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाटमारी, लूट व दरोड्याच्या घटना थांबायचे नावच घेत नाहीत. गेल्या दीडएक वर्षांपासून वारंवार घडणाऱ्या या घटनांवरुन मोहोळ पोलिस प्रशासनाने सुरवंटावस्था धारण केल्याचे, स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्याच्या कायदा व सुव्यस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. या घटनेनंतर तरी मोहोळ पोलिस यातून काहीतरी बोध घेतील अशी अपेक्षा सामान्य नागरीकांना आहे.

Back to top button