मंगळवेढा : गतवेळी सत्तांतर का घडले याचे आत्मपरिक्षण व्हावे | पुढारी

मंगळवेढा : गतवेळी सत्तांतर का घडले याचे आत्मपरिक्षण व्हावे

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा :  स्व. नानांनी सभासद वाढवले, कामगार व सभासदांची देणी दिली असताना 2016 ला सत्तांतर का झाले यांचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा नियोजन सदस्य तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी व्यक्त केले.

आप्पाश्री लॉन्सवर श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या समविचारी बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन भालके बोलत होते. व्यासपीठावर राहुल शहा, बबनराव आवताडे, अ‍ॅड. नंदकुमार पवार, लतीफ तांबोळी, शशिकांत बुगडे, रामचंद्र वाकडे, प्रकाश गायकवाड, तानाजी खरात, दामोदर देशमुख, बसवराज पाटील, अ‍ॅड. राहुल घुले, सोमनाथ माळी, संजय कट्टे, मारुती वाकडे, तानाजी काकडे, भारत नागणे, दादा गरंडे, पी. बी. पाटील, सोमनाथ माळी, चंद्रशेखर कौंडुभैरी, नितीन नकाते, हणमंत दुधाळ, दत्तात्रय खडतरे, ईश्‍वर गडदे, आप्पा चोपडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, स्व. मारवाडी वकील व स्व. शहा यांच्या काळातील सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला गेला. आता दुर्लक्ष केले, तर भविष्यात निवडणुकीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 97 व्या घटना दुरुस्तीने मीही दामाजीसारखे विठ्ठलचे सभासद रद्द करू शकलो असतो. पण ते पाप मी केले नाही. उलटपक्षी 28 हजार सभासदांमधील मृतांच्या वारसांना सभासदत्व देण्याचे काम मी केले. तरीही आमच्याविषयी समज – गैरसमज पसरवल्याने सत्ताबदल झाला. 3 लाख 69 हजार 705 पोती साखर व 10 हजार मे. टन मोलॅसिस असा 116 कोटींचा माल शिल्लक होता. त्यावेळी देणी 105 कोटी असताना चुकीची अफवा पसरवली, असेही त्यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष अ‍ॅड. नंदकुमार पवार म्हणाले की, बगॅस, मोलॅसिस, साखर, कोट्यवधी भंगार शिल्लक असताना सत्ता सोडली. पण विद्यमान संचालक मंडळाने काही शिल्लक ठेवले नाही. नवीन संचालक मंडळाला एफआरपीसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. दामाजी कारखाना संचालकांनी नव्हे, तर कामगारांनी चालवला.

यावेळी बोलताना आप्पा चोपडे म्हणाले की, व्यासपीठावरील समविचारी नेत्यांची आधी एकी करा. जागेसाठी अडू नका आणि हळकुंडासाठी लगीन मोडू नका.

अ‍ॅड. राहुल घुले म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फक्त प्रचारापुरता वापर न करता खांद्याला खांदा लावून सोबत राहू, पण आमचाही विचार करा. दुर्योधन पुजारी यांनी सभासद म्हणून वार्षिक सभेत एक शब्दही बोलू शकलो नाही.
रामचंद्र वाकडे म्हणाले की, उमेदवार निवडत असताना ज्यांच्या मागे 700 मते मिळवतील अशांना संधी द्यावी. दामोदर देशमुख म्हणाले की, पुन्हा दामाजी कारखान्याची निवडणूक व्हायची असेल, तर हे संचालक मंडळ हटवले पाहिजे.

हात उंचावून दाखवली एकजूट

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी सावध भूमिका घेत व्यासपीठावरील नेत्यांनी आपली एकजूट दाखवावी, असे सांगत यासाठी सर्वांना हात उंचावून दाखवण्यासाठी सांगितले व मग उपस्थितांनी एकजुटीने प्रयत्न करण्यावर हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

Back to top button