सोलापूर : आरक्षणावरून आघाडीत होणार बिघाडी ? | पुढारी

सोलापूर : आरक्षणावरून आघाडीत होणार बिघाडी ?

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिला आरक्षणासंदर्भात चित्र स्पष्ट झाल्यावर आता दिग्गज पुरुष उमेदवारांना तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

मनपाच्या इतिहासात गत निवडणुकीत (सन 2017) पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. गटा-तटांच्या राजकारणामुळे मनपात भाजपला व्यवस्थित कारभार करता आला नाही. मात्र ते कारण पुढे करून भाजपवर शरसंधान साधण्यात विरोधक कमी पडले. कारण विरोधकांमध्ये एकी नव्हती. विरोधकांमधील ही बेकी भाजपच्या पथ्यावर पडली, हे सर्वश्रुत आहे.

आता लवकरच होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीतदेखील आघाडीतील बिघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात आघाडी असली तरी मनपा निवडणुकीत अशी आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीमधून राष्ट्रवादीत गेलेल्या व जाणार्‍यांचे प्रमाण मोठे असल्याने या सर्वांना न्याय देण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

माजी महापौर श्रीकांचना यन्नम व माजी सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या प्रभाग क्र. 30 मध्ये अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पडले नाही. पण मागील प्रभागाचा परिसर निम्मा कमी होऊन नवीन भाग जोडला गेला असला तरी तो काही प्रमाणात अनुकूल आहे. त्यामुळे त्यांना हा प्रभाग फायदेशीरच ठरणार आहे.

माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या गत प्रभागातील 80 टक्के भाग प्रभाग क्र. 25 ला जोडला गेला आहे. प्रभाग क्र. 24 मध्ये अनुसूचित जमातीचे (पुरुष) आरक्षण पडले आहे. त्यांना ते प्रतिकूल ठरणार असल्याने प्रभाग क्र. 25 मधील सर्वसाधारण जागेवरुन लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा निर्णय त्यांच्याद़ृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या प्रभाग क्र. 6 मध्ये महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्याने पेच निर्माण झाला आहे. कारण सर्वसाधारण जागेवर सुरेश पाटील, राजू पाटील, बाबुराव जमादार, चन्नवीर चिट्टे आदी दिग्गज इच्छुक आहेत. त्यामुळे सुरेश पाटील यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे. तिकीट न मिळाल्यास ते बंडाचा झेंडा हाती घेतील काय, यावर उलटसुलट चर्चा होत आहे.
प्रभाग क्र. 11 मध्ये माजी महापौर मनोहर सपाटे, देवेंद्र कोठे यांचे सूर न जुळल्यास त्याचा फटका सपाटेंना बसू शकतो. प्रभाग क्र. 12 मधील अनुसूचित जातीची हजारो मते प्रभाग क्र. 21 मध्ये समाविष्ट झाल्याने करगुळे दाम्पत्यास वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवावी लागणार आहे.

भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले बिज्जू प्रधाने, तर काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले सुभाष डांगे यांना तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशीच अवस्था एमआयएमच्या तौफिक शेख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची राहणार आहे. जातीय, धार्मिक समीकरणांचा विचार करुन त्यानुसार उमेदवारी न दिल्यास त्याचा फटका अनेक राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे. वंचितमधून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले गणेश पुजारी यांच्यासमोरही तिकीट मिळवण्याचे आव्हान आहे.

प्रभाग क्र. 13 मध्ये एक पुरुष, दोन महिलांचे आरक्षण झाल्याने माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची डोकेदुखी झाली आहे. संकेत पिसे, नाना काळे, श्रीकांत घाडगे, असे दिग्गज उमेदवार याचठिकाणी इच्छुक असल्याने यात कोण बाजी मारणार, याविषयी उत्सुकता आहे.

कुणाच्या पथ्यावर, तर कुणी बंडाच्या पवित्र्यात

काँग्रेसचा प्रभाव असलेल्या अनेक प्रभागांमध्ये एकच महिलेचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे ते या पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र. 2, 6 मध्ये दोन महिलांचे आरक्षण निघाल्याने त्याचा पुरुष कार्यकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रसंगी ते बंडाचे निशाणही फडकाविण्याची शक्यता आहे.

Back to top button