

मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा
अज्ञात चोरट्यांनी मोहोळ तालुक्यातील येवती येथे घरफोडी करुन रोख रक्कमेसह पावणेतीन लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि. ३१) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येवती (ता. मोहोळ) येथील विजय दत्तात्रय माने ट्रॅक्टरचे सेल्समन म्हणून काम करतात.सोमवारी (दि.३०) रात्री माने कुटुंबीय जेवण करुन झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी विजय माने झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली. त्यानंतर कपाट असलेल्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून कपाट उचकटून कपाटातील २ लाख ६० हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम १० हजार असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
विजय माने हे पहाटे साडेतीन वाजता लंघुशंकेसाठी घराच्या बाहेर येऊ लागले. मात्र बाहेरुन कुणीतरी दरवाजाला कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेजारील शशिकांत पवार यांना फोन करून बोलावून घेतले, त्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. कपाट ठेवलेल्या खोलीचादेखील कडी-कोयंडा उचकटलेला दिसले. कपाट व त्यामधील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. याप्रकरणी विजय माने यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.
अज्ञात चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान…
गेल्या आठवडाभरापासून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी डोके वर काढले आहे. यादरम्यान अनेक घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दिवसेंदिवस चोरी व घरफोड्यांच्या घटना वाढत असल्यामुळे, त्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.