वाढत्या दरामुळे सूर्यफूल बियाणे उपलब्ध करून द्या | पुढारी

वाढत्या दरामुळे सूर्यफूल बियाणे उपलब्ध करून द्या

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांना कृषी खात्यामार्फत माफक दरामध्ये सूर्यफूल बियाणे उपलब्ध करून द्यावेत, तरच या वर्षी शेतकरी सूर्यफुलाची पेरणी करू शकणार आहे; अन्यथा एवढे महाग बियाणे घेऊन सूर्यफूल पेरणी शेतकरी करू शकणार नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी नायब तहसीलदार पंकज राठोड यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम जवळ आल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तेल बियांना चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी सूर्यफूल सारख्या पिकाकडे वळत आहे.

गेल्या वर्षी सूर्यफुलाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी सुद्धा सूर्यफूल करण्यासाठी शेतकरी दुकानदाराकडे बियाणे ची पिशवी घेण्यासाठी जात आहे. 2 किलो सूर्यफूल बियाणाची पिशवी 2500 रुपये ते 3000 रुपये दर सांगितला जात आहे. गेल्यावर्षी 1100 रुपयेला मिळणारी पिशवी या वर्षी 3000 रुपयाला विक्री होत असेल तर खर्‍या अर्थाने बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍याला लुटायचा मोठा डाव आखला आहे. सरकारने अशा या मुजोर बियाणे कंपन्या वर नियंत्रण ठेवायला पाहिजे, असे म्हटले आहे. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुदगल, पांडुरंग बाबर, प्रभाकर कोळी, रवी गोवे आदी उपस्थित होते.

बियाणे विक्रेत्यांकडून बियाण्याची किंमत एका वर्षात दुप्पट केली जाते. मात्र, शेतकर्‍यांच्या पिकवलेल्या मालाला गेल्या दहा वर्षांत सुद्धा दुप्पट दर मिळालेला नाही. ही खरी शेतकर्‍यांची मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे सरकारने कृषी खात्यामार्फत बियाने उपलब्ध करून द्यावेत.
– युवराज घुले,
जिल्हा संघटक, स्वाभिमानी

Back to top button