

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जोपर्यंत ही योजना रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला.
दरम्यान, लाकडी-निंबोडी योजनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काठेवाडी या गावाचादेखील समावेश असल्याचे संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगत अजित पवार यांनीच पाणी पळविले असल्याचा आरोप केला आहे.
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत रविवारी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय पाटील -घाटणेकर बोलत होते. यावेळी उजनी पाणी संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, सुहास घोडके आदीसह शेतकरी उपस्थित होते.
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला 348 कोटी रुपये मंजूर केल्याचा अध्यादेश निघाला आहे. यामुळे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने याला विरोध करत आंदोलने सुरू केली आहेत.याप्रसंगी संजय पाटील -घाटणेकर म्हणाले की, लाकडी -निंबोडी योजनेला 348 कोटीचा निधी देवून सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी पळवून नेले जात आहे. ही योजना जुनीच आहे, असे सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे. यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकर्यांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत.
पालकमंत्री बदलण्यासाठी आमचा लढा नाही तर पालकमंत्र्यांनी दिशाभूल करुन या योजनेस सहकार्य केल्याबद्दल आमचा विरोध आहे. मात्र, जोपर्यंत ही योजना रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असून, अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. लाकडी-निंबोडी या योजनेतून बारामती व इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देण्याची योजना आहे.
मात्र, गेल्या 75 वर्षांपासून बारामती तालूक्यात बारमाही पाणी असलेल्या काठेवाडी गावाचाही या योजनेत समावेश आहे. याकरिता
बारामतीच्या तहसीलदारांनी काठेवाडी दुष्काळी गाव असल्याचा दाखलादेखील दिला आहे. त्यामुळेच ही योजना मंजूर झाली असल्याचा आरोपही संजय पाटील-घाटणेकर यांनी केला आहे.
जिल्ह्यातील अपूर्ण योजना पूर्ण करा
सोलापूर जिल्ह्यात अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यांना एक रुपयादेखील निधी दिला जात नाही. मात्र, नव्याने लाकडी-निंबोडी योजनेला 348 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले जातात. म्हणजेच राज्य सरकार हे जाणून बुजून करत असल्याचा आरोपही संजय पाटील यांनी केला.