

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : 'स्मार्ट सिटी' कंपनीकडून अगोदर काम, नंतर वर्कऑर्डर तसेच कामांसंदर्भात तांत्रिक तपासणी न करताच बिले अदा करण्याचा प्रकार घडला आहे. ज्यांच्या कालावधीत काम झाले नाही, अशा मुख्य तांत्रिक अधिकार्याने बिलावर सही केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी केला आहे.
यासंदर्भात सोनवणे यांनी पोलिस व मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'स्मार्ट सिटी' अंतर्गत गटारी, रस्ते, फुटपाथ, इलेक्ट्रिक वर्क आदी कामे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळी वेस चौक, कोंतम चौक, लकी चौक, दत्त चौक, नवी पेठ, मधला मारुती, नंदीध्वजमार्ग, भैय्या चौक, रामलाल चौक, पार्क चौक, पंच कट्टा, विजापूर वेस आदी ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या कामांमध्ये गडबड, गोलमाल झाल्याचे निदर्शनास येत आहे. विजय इन्फ्रा या कंपनीस 28 जून 2021 रोजी अंदाजे 11 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे.
या कामांसाठी पीएमसी म्हणून ध्रुव कंन्स्लटन्सी यांना 28 जून 2021 रोजी वर्कऑर्डर देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही कामे एप्रिल आणि मे मध्येच झाली होती. वर्कऑर्डर दिल्यानंतर त्याच दिवशी या कंपनीने रव्ह्युव्हड् म्हणून बिल अदा करण्यासंदर्भात पत्र दिले. प्रत्यक्षात संपूर्ण कामाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून त्या पद्धतीने तांत्रिक अभिप्राय देणे अपेक्षित होते. तसे न करता केवळ पीएमसीच्या रिव्ह्युव्हड् पत्रावर अंदाजे 11 कोटींचे बिल अदा करण्यात आले आहे. ज्यांच्या काळात कामे झाली नाहीत, अशा मुख्य तांत्रिक अधिकार्यांची अदा बिलासंदर्भातील मेजरमेंट बुकवर सही घेण्यात आली.प्रत्यक्षात तांत्रिक अधिकार्यांनी साईटवर पीएमसीला सोबत घेऊन झालेल्या कामाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही, ही बाब गंभीर आहे.
केवळ उपलब्ध निधी खर्ची पडावा म्हणून स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी पीएमसीसोबत संगनमताने गैरकारभार केल्याचे सिध्द होत आहे. याप्रकरणी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी केली आहे.
चौकशी होणार का?
'स्मार्ट सिटी'च्या कामांबाबत झालेल्या या आरोपांची दखल घेऊन त्याची चौकशी होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. चौकशी झाली तरच आरोपांसंदर्भात शहानिशा होणार आहे.