सोलापूर : सांगोला बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य | पुढारी

सोलापूर : सांगोला बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

सांगोला (सोलापूर ) : पुढारी वृत्तसेवा :  सांगोला बसस्थानक आवारामध्ये असलेली गटार तुडुंब भरली आहे. या गटारीच्या दुर्गंधीमुळे प्रवासी व कर्मचार्‍यांना त्रास होत आहे. तसेच, आवारामध्येच इतरत्र कचरा पडल्याने बसस्थानकावरच अस्वच्छता दिसत आहे.

सांगोला बसस्थानक हे कोकण, मराठवाडा या विभागाचे प्रमुख महामार्गावरील बस स्थानक आहे. या बसस्थानकवर कोकण व गोवा मधून तसेच कोल्हापूर, मिरज, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, पुणे, अथणी या प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्या या बस स्थानकावर थांबतात. यामुळे या बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. तसेच हे बस स्थानक रत्नागिरी- नागपूर या महामार्गावर असल्याने कोकण, मराठवाडा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र या राज्याच्या मध्यभागी हे बस स्थानक असल्याने तसेच या बस स्थानकातून ग्रामीण भागासाठी ही मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत. यामुळे या बस स्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.

सांगोला बसस्थानकाच्या समोरील गटार ही घाणीने तुडुंब भरली आहे. अनेक दिवसांपासून या गटारीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. यामुळे या गटारी मधील घाणीची दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीचा त्रास या ठिकाणाहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना होतो. त्याच बरोबर बसस्थानक परिसरात असलेल्या व्यापार्‍यांनाही होतो. तसेच शहरातील भोपळे रोडला असणारे पानटपर्‍या, छोटी-मोठी व्यवसायिक प्रवासी यांनाही या घाणीचा त्रास होत आहे. तसेच मायाक्का मंदिराच्या समोरील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्त परिस्थितीत पसरलेला आहे. हा कचरा वारा सुटल्यावर बसस्थानकातील पटांगणामध्ये एस.टी.ची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर येतो. या बस स्थानक परिसरातील गटारी अस्वच्छ आहेत. तसेच परिसरही अस्वच्छ आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. याचा त्रास प्रवासी व व्यापारी कर्मचारी यांना होतो. या गटारी ची साफसफाई करावी व बस स्थानक हद्दीत इतरत्र टाकण्यात आलेला कचरा साफ करून त्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

बसस्थानकातील गटारीची साफसफाई करण्यासाठी नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. ही गटार नवीन करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. याचे काम लवकरच चालू केले जाणार आहे. परिसरातील स्वच्छता करण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना सांगितले आहे.
– पांडुरंग शिकारे, आगार व्यवस्थापक, सांगोला बसस्थानक

Back to top button