मान्सूनपूर्व पावसाने द्राक्षांचा झाला चिखल | पुढारी

मान्सूनपूर्व पावसाने द्राक्षांचा झाला चिखल

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने द्राक्षे पिकांची मोठी हानी केली आहे. अगोदरच दर नसताना शेतकरी संकटात सापडले होते. यातच पावसाचा तडाखा बसल्याने द्राक्ष बागा कोलमडून पडल्या आहेत, तर निर्यातक्षम द्राक्षे गळून पडल्याने त्यांचा बागेतच चिखल झाला आहे. द्राक्षे व्यापारी खरेदी करत नसल्याने मालासह छाटणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

बुधवारी व गुरुवारी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात विशेषत: द्राक्ष पीक पावसाला बळी पडले आहे. शेतकर्‍यांनी औषध, पाणी, खते, मजूर यावर लाखो रुपये खर्च करून बागा जोपासल्या आहेत. हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यातून कसेबसे सावरत बागा फुलवल्या. मात्र, ऐन उतरणीला आल्यावर मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. चार दिवस ढगाळ वातावरणाचा तर दोन दिवस पावसाचा दुष्परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे.

हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने द्राक्षे घड व मन्ण्यांवर पाणी साचल्याने मणी गळून पडले आहेत, तर घडावर पाणी साचून राहिल्याने घड नासले आहेत. जो काही द्राक्षमाल बागेत आहे, तो विक्री करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.
मात्र, वाढती आवक पाहून व बसलेला पावसाचा फटका पाहून व्यापारी कमी दराने जागेवर मागणी करत आहेत. मार्केटला घेऊन गेले तर शेतकर्‍यांना हाती काहीच लागत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी बेदाणा निर्मिती करण्यावर भर दिला आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांनी मार्केटिंगचा माल तयार केला आहे, त्या शेतकर्‍यांचा माल विक्री होत नसल्याने शेतकर्‍यांनी जागेवर बागा सोडून दिल्या आहेत. शिवाय बेदाणा निर्मितीचा खर्च परवडत नसल्याने बेदाणा निर्मिती करत नाहीत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे बेदाणा शेडचे छत उडून गेले आहेत. वादळी वारा व मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे बेदाणा भिजून काळा पडत आहे.
एकंदरीत चालू वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचा औषध, खत पाण्याचा खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे एकरी किमान 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सोसावे लागत आहे.

माझी 3 एकर द्राक्षबाग आहे. यापैकी दीड एकर माल व्यापर्‍यांच्या मागे लागून घालवला आहे. मात्र, राहिलेल्या दीड एकर द्राक्षांना व्यापारी मागणी करेनात. त्यामुळे द्राक्षे पुढे चालली. अखेर वैतागून जागेवर द्राक्षे छाटणी केली आहे. त्यामुळे किमान 7 लाखांचे नुकसान झाले असून चार लाख खर्च वाया गेला आहे.
– ज्ञानेश्वर दत्तात्रय ढोबळे
शेतकरी, गुंजेगाव

Back to top button