सोलापूर : नातवाकडून आजीचा खून | पुढारी

सोलापूर : नातवाकडून आजीचा खून

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : लग्‍न का लावून देत नाही म्हणून नातवाने आजीच्या डोक्यात काठीने मारून तिचा खून केल्याची घटना शेळगी परिसरातील आदर्श नगरात घडली. खून करणार्‍या नातवाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत फिरोज शकूर नदाफ (वय 25, रा. आदर्श नगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम जहाँगीर नदाफ (रा. जिरंकली, कर्नाटक सध्या आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालनबी हसनसाब नदाफ (वय 70, रा. आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे.

14 मे रोजी सायंकाळी फिरोज नदाफ हे घरात झोपले होते. त्यावेळी फिरोज यांची मावस आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या. त्यावेळी फिरोज याच्या मामाचा मुलगा सलीम नदाफ याने मालनबी यांना तु माझे लग्न का लावून देत नाही, उगाच कर्नाटक येथून बोलावून का घेतले? असे म्हणून मालनबी यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले.

त्यावेळी फिरोज, त्याची बहिण व बहिणीचा पती यांनी जखमी मालनबी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरु असताना मालनबी यांचा मृत्यू झाला. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button