अबब! सोलापूरचा पारा 44.3 अंशांवर | पुढारी

अबब! सोलापूरचा पारा 44.3 अंशांवर

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळ्यात सोलापुरात सोमवारी सर्वाधिक 44.3 अंश तापमानाची नोंद झाली. तळपते ऊन व धग यामुळे सोलापूरकर प्रचंड त्रस्त दिसून येत आहेत. उच्चांकी तापमानामुळे रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा सर्वाधिक 43.3 अंशांवर गेला होता. 28 एप्रिल रोजी 42.9 व 29 एप्रिल रोजी 43.3 अंश सेल्शियस तापमान होते. मे महिन्यात गेल्या दोन दिवसापासून उच्चांकी तापमानाकडे वाटचाल सुरू झाली.

उन्हाचा पारा रोजच वाढत असल्याने सकाळी अकरापूर्वी सोलापूरकर महत्त्वाची कामे उरकताना दिसून येत आहेत. सायंकाळी सातनंतरच रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. दुपारच्या सत्रात शहरातील सर्वच रस्ते ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उन्हाळ्यात सोलापूरकरांना एसी, कुलर, फॅनचा आधार घ्यावा लागतो. भारनियमनामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असल्याने या साधनांचा वापरही करता येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. भारनियमनामुळे वीजपुरवठा खंडित होऊन एसी, फॅन बंदमुळे सर्वजण घामाघूम होत असल्याचे चित्र सोलापुरात दिसून येत आहे.

चालू महिन्याच्या उत्तरार्धात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच भारनियमनही अधिक वेळ होण्याची शक्यता असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात घामाघूम होण्याची वेळ सोलापूरकारांवर येणार हे निश्चित आहे.

उष्माघातच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

वाढत्या उन्हामुळे उष्माघाताने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना दिसून येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. शरीरातील पाणी कमी होणे, अशक्तपणा जाणवणे, डोकेदुखी आदी प्रकारच्या आरोग्य समस्यांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खाागी दवाखान्यांत अशा रुग्णांची संख्या प्राधान्याने दिसून येत आहे.

Back to top button