सोलापूर : उन्हामुळे मजुरांची कामाला दांडी | पुढारी

सोलापूर : उन्हामुळे मजुरांची कामाला दांडी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तापमानात वाढ होत आहे. मे महिन्यातही तापमानाचा आलेख वाढत आहे. रणरणत्या उन्हात काम करणे मुश्कील झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांनी कामावर दांडी मारली आहे. मजूरच कामावर येत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल सात हजार घरकुल व 1 हजार 205 विहीरीचे काम अर्ध्यावर राहिले गेले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागात विविध प्रकाराचे वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपात कामे घेण्यात येतात. या ठिकाणी कामावर येणार्‍या मजूरांना रोज सुमारे 258 रुपयांची मजूरी देण्यात येते. एकीकडे मजूरीही कमी व कडक उन्हात काम करणेही मुश्कील असल्याने या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाभरात सध्या 393 विविध कामे सुरू आहेत. या कामावर एकूण 2 हजार 800 मजूर काम करीत आहेत. ग्रामपंचायत विभागाने सर्वाधिक 292 कामे सुरू केली असून यात 2 हजार 71 मजूर काम करीत आहेत. तर अन्य विभागाकडून 101 कामे सुरू असून यात 729 मजूर काम करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर, जनावरांचा गोठा, घरकुल बांधणी यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांची मागणी आहे. मात्र या योजनेत मजुरी कमी मिळत असल्याने व उन्हात काम करणे अवघड झाल्याने या योजनेकडे मजूरांनी पाठ फिरवले आहे.
शेतकर्‍यांच्या शेतात काम करणार्‍या मजुरास किमान तीनशे ते पाचशे रुपयांची मजुरी देण्यात येते. रोजगार हमी योजनेत आठ तास काम केल्यानंतरही अडीचशे रुपयेही मजुरी मिळत नसल्याने या कामांसाठी मजुरांची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजुरांची मजुरी वाढविणे अत्यंत आवश्यक बाब ठरली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावाचा आराखडा तयार करण्यात आला. या योजनेत मागणी करेल त्या मजूराला काम देण्याची शाश्वती केंद्र शासनानी घेतली आहे. मात्र अल्प मजुरी दरामुळे मजुरांचा प्रतिसाद कमी आहे.

 

Back to top button