सोलापूर : दहिगाव योजनेचे पाणी न मिळाल्याने पिके जळाली | पुढारी

सोलापूर : दहिगाव योजनेचे पाणी न मिळाल्याने पिके जळाली

करमाळा (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी न मिळाल्याने करमाळा तालुक्यातील घोटी, निंभोरे, वरकुटे येथील शेती पिके जळून गेली आहेत. जळून गेलेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले.

दहीगाव योजनेचे आवर्तन सुरु होऊन दोन महिन्याहून अधिक काळ झाला तरी पाणी मिळाले नाही. टेल टू हेड असे कायद्याने पाणी देणे बंधनकारक असताना ही दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्‍यांनी दरवर्षीप्रमाणे मनमानी पद्धतीने पाणी सोडलेले आहे. सध्या घोटीच्या सहा नंबर चारीला अद्याप पाणी सोडलेले नाही. घोटी, निंभोरे, वरकुटे आदी भागात आजही पाणी मिळालेले नाही.

सध्या तीव्र उन्हाळा चालू आहे. विहिरींना/बोअरला पाणी नसल्याने या पिकांना दहीगाव योजनेचे पाणी मिळणे आवश्यक होते. पण ते पाणी मनमानी कारभार करणार्‍या अधिकार्‍यांनी न दिल्याने पिके जळून खाक झाली आहेत. शेतातील केळी, कलिंगड, खरबूज, झेंडू, मका, पपई, भुईमुग, कांदा, ऊस आदी पिके आता जळून खाक झाली आहेत.

या करपून गेलेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. याबरोबरच घोटी निंभोरे व वरकुटे या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर ही चालू करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर सचिन राऊत (घोटी), अविनाश वळेकर (निंभोरे), दादासाहेब भाडंवलकर (वरकुटे) आदींच्या सह्या असून ती कृषिमंत्री, जिल्हाधिकारी आदी संबंधितांना निवेदने दिली आहेत.

Back to top button