सोलापूर : टेंभू योजना थकबाकीच्या विळख्यात | पुढारी

सोलापूर : टेंभू योजना थकबाकीच्या विळख्यात

सांगोला (सोलापूर) : भारत कदम :  सांगोला, आटपाडी, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील जनतेला वरदायी ठरलेली टेंभू उपसा सिंचन योजना आहे. या योजनेचे पाणी टेंभूच्या सांगोला शाखा कालव्याद्वारे 2014-15 पासून देण्यात येत आहे. सांगोला व आटपाडी तालुक्यातील 22 गावांतील शेतकर्‍यांकडे या पाण्याची पाणीपट्टी 2 कोटी 6 लाख 60 हजार रुपये आहे. ही पाणीपट्टी शेतकर्‍यांनी तत्काळ भरावी व टेंभू उपसा सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत. पुढील आठवड्यापासून टेंभूच्या सांगोला शाखा कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे .

दुष्काळी भागाला वरदान ठरलेली टेंभू उपसा सिंचन योजना ही कृष्णा नदीच्या टेंभू गावामध्ये सुरुवात करण्यात आली. या ठिकाणाहून मोठमोठ्या मोटारी लावून हे पाणी मोटारीच्या साह्याने हिंगणगाव (ता.कडेपूर) येथील साठवण तलावात सोडले जाते. या साठवण तलावांमधून पुन्हा मोठ-मोठ्या मोटारींनी पाणी उचलले जाते व हे पाणी माहुली येथील साठवण तलावात सोडले जाते.

या तलावांमधून पंपाव्दारे सांगोला शाखा कालव्यामध्ये कॅनॉलद्वारे नेले जाते. अशाप्रकारे तीन ठिकाणी मोटारींच्या साह्याने पाण्याचा उपसा केला जात असल्याने हे पाणी उपसण्यासाठी मोटारीला मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. या विजेचे बिल भरमसाठ येते.
यामुळे या योजनेचे पाणी शेतकर्‍यांना महागाईच्या दराने घ्यावे लागते. या योजनेच्या वीज वापरावर मोठा खर्च होत आहे. हा खर्च शेतकर्‍यांना महागडा आहे. यामुळे भविष्यात या योजनेचे पाणी शेतकर्‍यांना नकोसे वाटणार आहे.

2020-21 या सालामध्ये कृष्णा नदीला पूर आला होता. हे पुराचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेमधून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या अवर्षणप्रवण (दुष्काळी) भागांमध्ये सोडण्यात आले होते. या अतिरिक्त पुराचे पाणी वळवल्याने काहीअंशी पुरावर मात करता आली होती. यावेळी आकारण्यात आलेल्या पाणीपट्टीपैकी वीज बिलाचा खर्च शासनाने टंचाईच्या निधीमधून भरावा व निव्वळ पाणीपट्टी शेतकर्‍यांवर आकारण्यात यावी, अशी शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे. अशा प्रकारची पाणीपट्टीची आकारणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर झाल्याची चर्चाही आहे. त्याचप्रमाणे टेंभू उपसा सिंचन योजनेवरही टंचाई निधीतून वीज बिल भरावे. त्यामुळे सांगोला, आटपाडी, कवठेमहांकाळ या कायम दुष्काळी तालुक्यांतील शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. टंचाई निधीतून टेंभू उपसा सिंचन योजनेचे वीज बिल भरावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरू लागली आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सांगोला शाखा कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याची एकूण थकबाकी याप्रमाणे आहे. (गावाचे नाव, एकूण थकबाकी या क्रमाने) कोळा 73 लाख 6 हजार रुपये, तिप्पेहळी 18 लाख 61 हजार रुपये, जुनोनी 11 लाख 74 हजार रुपये, हातीद 6 लाख 19 हजार रुपये, पाचेगाव खुर्द 3 लाख 85 हजार रुपये, जुजारपूर 4 लाख 71 हजार रुपये, उदनवाडी 11 लाख 88 हजार रुपये, हटकर मंगेवाडी 95 हजार रुपये, राजुरी 3 लाख 31 हजार रुपये, वाटंबरे 4 लाख 40 हजार रुपये, अनकढाळ 8 लाख 31 हजार रुपये, चिनके 5 लाख 86 हजार रुपये, निजामपूर 2 लाख 5 हजार रुपये, अकोला 1 लाख 66 हजार रुपये, कडलास 3 लाख 76 हजार रुपये, जवळा 4 लाख 16 हजार रुपये, बुरूगेवाडी 2 लाख 25 हजार रुपये, सोनंद 3 लाख 33 हजार रुपये, हणमंतगाव 5 लाख 30 हजार रुपये, लोणविरे 6 लाख 16 हजार रुपये, अशी सांगोला तालुक्यातील 22 गावांतील शेतकर्‍यांकडे 1 कोटी 83 लाख रुपये थकबाकी आहे, तर आटपाडी तालुक्यातील तळेवाडी 13 लाख 13 हजार रुपये, पात्रेवाडी 10 लाख 44 हजार रुपये, अशी एकूण 23 लाख 57 हजार रुपये थकबाकी आहे.

सांगोला व आटपाडी तालुक्यातील 22 गावांतील शेतकर्‍यांकडे 2 कोटी 6 लाख 60 हजार रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी 2014-15 ते जानेवारी 2022 पर्यंतची आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सांगोला शाखा कालव्याद्वारे पाणी दिलेली थकबाकी तत्काळ भरावी. टेंभू योजनेच्या विभागाच्या कार्यालयाकडे पाणी मागणी अर्ज करावेत. पुढील आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
– सुशीलकुमार गायकवाड
उपविभागीय अभियंता, टेंभू योजना

Back to top button