अजित पवार म्हणाले, शिल्लक उसासाठी कारखान्यांना प्रतिटन 200 रु.

अजित पवार म्हणाले, शिल्लक उसासाठी कारखान्यांना प्रतिटन 200 रु.
Published on
Updated on

अनगर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होता कामा नये. यासाठीच येत्या एक मेपासून शिल्लक ऊस गाळप करण्यासाठी कारखान्यांना रिकव्हरी लॉस म्हणून प्रतिटन दोनशे रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सोबतच वाहतुकीसाठी पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रतिकिलोमीटर पाच रुपये देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने कृतज्ञता आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार व संयोजक राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनदादा शिंदे, यशवंत माने, निलेश लंके, संजय शिंदे, अमरसिंह पंडीत, राहुल पाटील, माजी आमदार दीपक सांळुखे, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, कल्याणराव काळे, संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, मोहोळ मतदारसंघातील नव्या सिंचन योजनासाठी राजन पाटील आणि आ. यशवंत माने यांची आग्रही भूमिका आणि पाठपुरावा सुरू आहे. यासाठी लवकरच मंत्रालयात जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

मोहोळ सिंचन योजना मार्गी लावू

नव्याने जाहीर झालेल्या अनगर आणि मोहोळ नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी येत्या आर्थिक वर्षातील निधी वाटपाच्या तरतुदीतून प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देऊ. त्यातून नव्या इमारती उभारल्या जातील. येत्या 31 मार्चपर्यंत योग्यरीतीने खर्च केला तर पुढील आर्थिक वर्षात आणखी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून करून देऊ, असेही पवार म्हणाले.

सामाजिक न्यायकडून 12 कोटी

धनंजय मुंडे म्हणाले, अनगर ग्रामपंचायत काळापासून ते आजतागायत बिनविरोध होणारी ही ग्रामपंचायत राज्यात पहिले उदाहरण आहे. अनगर हे गाव ग्रामपंचायत असल्यापासून विकासाने समृद्ध असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. आता नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे यापुढील काळातही या भागातील विकासात्मक वाटचाल अशीच गौरवास्पद रित्या सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. उपमुख्यमंत्री यांचे आदेश प्रत्येक मतदार संघाला दहा कोटी पर्यंतच्या निधी देण्याचे आदेश असताना सामाजिक न्याय विभागाकडून मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी झुकते माप देऊन 12 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

प्रास्ताविकात राजन पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा. त्याद्वारे अजित पवार यांनी हा बॅक लॉक पूर्ण करावा. नव्या सिंचन योजना मंजूर करून त्यांना निधी द्यावा. अनगर येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालयाची उभारणी तसेच मोहोळ आणि अनगर नगरपंचायतीच्या अद्यावत इमारतीसाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा निधी द्यावा. गेली तीस वर्ष हा मतदारसंघ शरद पवार यांच्या विचारांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. यापुढील काळातही पवार कुटुंबीयांकडून मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा असल्याचेही मत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news