सोलापूर : मुख्याध्यापकावरील अन्यायाचे सत्र संपेना | पुढारी

सोलापूर : मुख्याध्यापकावरील अन्यायाचे सत्र संपेना

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पती-पती एकत्र बदलीचे नियम धाब्यावर बसवत जिल्हा परिषद प्रशासनाने कन्नड मुख्याध्यापकाची बदली केली असून, ते दीड वर्षांपासून हक्कासाठी लढा देत आहेत. तरीही जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या काळजाला पाझर फुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कधी शिक्षणाधिकारी, कधी गटशिक्षणाधिकारी, तर कधी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे बोट दाखवत तडवळ जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांची बदली प्रशासनाने ताटकळत ठेवली आहे. यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. यासाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याबरोबरच स्वत:च्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून जिल्हा परिषद आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये उपोषणही केले. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे दादही मागितली. प्रत्येकवेळी फक्त आश्वासने देण्यात आली.

तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकाने यासाठी लाख रुपयेही उखळले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास चळेकर हे कट्टीमनी यांच्याकडून 25 हजारांची लाच घेताना सापडले. विनंती, मागणी, आंदोलने करुनही त्यांना प्रशासन न्याय देत नसल्याने मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी संताप व्यक्त करत मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठीही अर्जही दाखल केला आहे. तरीही जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग काहीच विचार करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वात कहर म्हणजे आता तर मैंदर्गी येथील बदली मान्य करण्यासाठी त्यांच्यावर दबावही टाकण्यात येत आहे.

आता पुन्हा नियमबाह्य बदलीची अंमलबजावणी करत 54 कि.मी. अंतरावर तडवळ येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत दाद मागितल्यानंतर विविध कारणे देण्यात येत आहेत. कट्टीमनी यांच्याबाबत अशी भूमिका घेणारे प्रशासन मात्र नागणसूर शाळेतील शिक्षिकेच्या विरोधात असलेल्या तक्रारीबाबत का दखल घेत नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. महिला तक्रार निवारण समितीने त्या शिक्षिकेचीही बदली करा, असा आदेश दिला होता. तरीही याकडे कानाडोळा करण्यात आला, याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. अक्कलकोट पंचायत समितीने नागणसूर शाळेत कट्टीमनी यांची बदली करण्याबाबत ठराव करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

यावरुन समान न्याय भूमिकेचा डांगोरा पिटविणार्‍या जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभाग मुख्याध्यापक कट्टीमनी यांना एक न्याय तर शिक्षिकेला दुसरा न्याय असा दुजाभाव का करत आहे, संशयाचा विषय आहे. तक्रार झालेल्या त्या शिक्षिकेची अन्यत्र बदली करण्यासाठी प्रशासनाला का अडचणी येत आहेत, हे समोर येणे गरजेचे आहे; अन्यथा प्रशासनाभोवती संशयाचा दोर आवळला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना तीनवेळा हवाईसफर

मुख्याध्यापक कट्टीमनी प्रत्येक शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढविली असून शिष्यवृत्ती परीक्षेतही सर्वाधिक मुले चमकली आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील गरीब शेतकर्‍यांच्या विद्यार्थ्यांना तीनवेळा मोफत हवाईसफर घडवून आणली आहे. याशिवाय अनेक उपक्रमही त्यांनी राबविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कट्टीमनी यांनी केले. तरीही त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे समोर येत आहे.

Back to top button