सोलापूर : आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पोलीस कोठडीतील आरोपीला मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करून तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यातच सीआयडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, पोलीस हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोलीस नाईक अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई अतिश काकासाहेब पाटील, पोलीस नाईक लक्ष्‍मण राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर विभागाचे उपअधीक्षक श्रीशैल सिद्रामप्पा गजा यांनी फिर्याद दाखल केली आहे. भिमा रजा काळे (वय 42, रा. भांबुरे वस्ती, कुर्डूवाडी, ता. माढा) असे मृत संशयित आरोपीचे नाव आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 सप्टेंबर 2021 रोजी सोलापूर जिल्हा कारागृह येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांनी आरोपी भिमा काळे यास वर्ग करून घेतले. 22 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयाकडून आरोपी भीमा काळे याची 25 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करुन घेतली होती. पोलीस कस्टडीत असताना भीमा काळे यास सर्दी, ताप, खोकला व उलट्या याचा त्रास होत असल्याने व त्याच्या दोन्ही पायास संसर्ग झाल्यामुळे त्याच्या दोन्ही पायास सुज आली होती. त्यामुळे भीमा काळे याला 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी मेडिकल यादीसह सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आरोपी भीमा काळे हा 3 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मृत्यू झाला. आरोपी भीमा काळे यांने गुन्हा कबूल करावा व चोरीस गेलेला मुद्देमाल काढून द्यावा म्हणून गुन्ह्याचे तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ, हवालदार खांडेकर, पोलीस नाईक भीमदे, पोलीस शिपाई पाटील, राठोड यांनी पोलीस कस्टडीत आरोपी भीमा काळे यास मारहाण केली होती. तसेच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी गुन्ह्यातील तपासी अधिकारी कोल्हाळ यांना गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेले दिसून आलेले नाही. तपासी अधिकारी कोल्हाळ यांनी अटक आरोपी भीमा काळे याला पोलिस निरीक्षक पाटील यांच्या समोर हजर केले असता तो लंगडत असल्याचे व त्याच्या दोन्ही पायावर काळे वृण दिसत असल्याचे निदर्शनास येऊन सुद्धा त्याची वैद्यकीय तपासणी केली नाही, तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याचे छायाचित्रण जतन करण्याची जबाबदारी असताना तसे केलेले नाही. म्हणून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपाधीक्षक जी. वी. दिघावकर पुढील तपास करीत आहेत.

Back to top button