धुळे: राम नवमीच्या मोटारसायकल रॅलीत प्रक्षोभक घोषणा ; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

धुळे: राम नवमीच्या मोटारसायकल रॅलीत प्रक्षोभक घोषणा ; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

धुळे: पुढारी वृत्तसेवा:  शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत प्रार्थनास्थळासमोर प्रक्षोभक घोषणा दिल्याचा आरोप करून शहर पोलिस ठाण्यात उत्सव समितीच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शासनाने पोलिसांवर दडपण टाकून सदर गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनी केला आहे.

शहरात श्री रामनवमीच्या निमित्ताने उत्सव समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीत काढण्यात आली.  यासंदर्भात धुळे शहर पोलिस ठाण्यात पोलिस हेडकॉन्स्टेबल सुधाकर रामदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले असताना बेकायदेशीररित्या जमाव जमवून विनापरवानगी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील एका प्रार्थनास्थळ समोर प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नागरीकांच्या भावना भडकवण्यासाठी घोषणा दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या संदर्भात योगेश हनुमंत भोकरे, विकी परदेशी, रोहित चांदोडे, मोहन टकले, लोकेश बडगुजर, राजू मराठे उर्फ राजू महाराज, प्रदीप जाधव, प्रणित मंडलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आघाडी सरकारच्या वतीने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे धुळे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केला आहे. याचा जाहीर निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यार्थी
नोकरदारांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून रॅली दरम्यान अनुचित प्रकार घडला असल्यास पोलिसांनी त्यांना सुरुवातीला नोटीस देऊन समज देण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून पोलिसांवर सरकारकडून दडपण आणले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button