सोलापूर : पाच दरोडेखोरांसह दोन सराफांना अटक | पुढारी

सोलापूर : पाच दरोडेखोरांसह दोन सराफांना अटक

सोलापूर / बार्शी : पुढारी वृत्तसेवा :  बार्शी शहरातील सुभाष नगर, वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल भागात दरवाज्याचे कडी-कोयंडे कटावणीने तोडून, उचकटून घरात प्रवेश करत घरातील व्यक्तींना मारहाण व चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी बार्शी पोलिस व सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून पाच आरोपींसह दोन सराफांनाही अटक करून त्यांच्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

किरण भोसले (वय 46, रा. तांबेवाडी, ता. बार्शी), कृष्णा उर्फे पिंट्या शिंदे (वय 40, रा. ठोंबरे नगर मुरुड, ता. जि. लातूर), लक्ष्मण पवार (वय 21, रा. भोसा, ता. जि. लातूर), अमोल उर्फ लल्या शिंदे (वय 25, रा. शारदादेवी नगर, वैराग, ता. बार्शी), अजय भोसले (वय 23, रा. तांबेवाडी, ता. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे असून शाम जडे (वय 40, रा. तुळशीराम रोड व कुमार भोसले (वय 27, रा. साईराज नगर दोघेही रा. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या सराफांची नावे आहेत. या गुन्ह्यात सहभाग असणारे उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील अद्याप सहा आरोपी फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की 5 फेब्रुवारी 2021 रोजी शुभारंभ भागातील धनंजय मुंढे यांच्या घरात 6 चोरट्यांनी प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून 25 तोळे सोन्यांचे दागिने लुटून नेले होते. 7 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री वाणी प्लॉट भागातील विश्वास जाधवर वय 74 यांच्या घरात जबरदस्तीने घुसून चाकू व लोखंडी गजाचा धाक दाखवून 94 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यानंतर 1 डिसेंबर 2021 रोजी रात्री शुभाषनगर भागातील कथले विहार येथील तलाठी योगेश जगताप यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून काठ्या, कटावणी व चाकूचा धाक दाखवून 2 लाख 65 हजारांचा ऐवज लुटून नेला होता. 2 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्री वाणी प्लॉट भागातील भगवंत कॉलनी भागात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करत लाकडी दांडके व सुर्‍याचा धाक दाखवून 3 लाख 5 हजारांचा ऐवज लंपास केला होता.

गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा बार्शीकडील दोन पथके तयार करण्यात आली होती. पथकाने परभणी, सिंदखेड राजा, औरंगाबाद, येथून काही संशयित आरोपी आणून त्यांना अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत तपास केल्यानंतर कीर्तीनगर अक्कलकोट रोड सोलापूर दरोड्यातील काही संशयित आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे काही आरोपी मिळून आले. त्यांची घरझडती घेतली असता दरोडे घालण्यासाठी वापरत असलेली हत्यारे व गुन्ह्यातील काही सोन्याचे दागिने मिळून आले. आरोपींना अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी बार्शी शहरात गुन्हे केल्याची कबुली देऊन दरोडे टाकल्याची ठिकाणे दाखवली. त्याचे इतर साथीदार हे वैराग, परांडा, तुळजापूर हे तपासात निष्पन्न झाले. अटक आरोपीकडून पोलिस कोठडी दरम्यान गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर गुन्ह्यातील अमोल शिंदे व अजय भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी वैराग येथे पकडून बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिल्याने त्यांना अटक केली आहे. त्यांनी सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे बार्शी शहरातील सराफांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही सराफांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून काही सोन्याचे दागिने व लगड हस्तगत केली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी बार्शी डॉ. विशाल हिरे व जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीचे पो. नि. रामदास शेळके, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सुहास जगताप, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि ज्ञानेश्वर उदार, सपोनि स्वप्नील इज्जपवार, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट, सपोफौ अजित वरपे, अरुण माळी, रेवण्णा भोंग, रविकांत लगदिवे, ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगिर, सायबर पोलिस ठाण्याचे रतन जाधव यांच्यासह बार्शी आणि ग्रामीण पोलिसांनी कामगिरी केली.

दरोड्यातील जप्त मुद्देमाल

दरोड्यातील एकूण 44 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने (22,35,000) व 3 भार चांदीच्या वस्तू (12,000) व रोख रक्कम 85,000 रोख रक्कम असा एकूण 23,32,000 मुद्देमाल चोरीस गेला होता. त्या मुद्देमालातील एकूण 35 तोळे 04 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 17,70,000 व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमत 70,000 असा एकूण 18,40,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपींनी उस्मानाबाद, परांडा, वैराग, माढा जामखेड या भागात असेच गुन्हे केलेले आहेत.

Back to top button