सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला ‘आघाडी धर्मा’चा अडसर? | पुढारी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला ‘आघाडी धर्मा’चा अडसर?

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शुक्रवारचा (दि. 25) नियोजित सोलापूर दौरा रद्द होण्यामागे ‘महाविकास आघाडी धर्म’ कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे. आपल्या उपस्थितीत जर आघाडीच्या घटक पक्षांतील नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास आघाडी धर्माला हरताळ फासल्याचे खापर फोडले जाण्याच्या भीतीने पवारांनी हा दौरा टाळल्याचे समजते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या काँग्रेसच्या ‘विजय संकल्प’ मेळाव्यात राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. एवढेच नव्हे मनपावर सत्ता आणू इच्छिणार्‍या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी या मेळाव्यात सोलापूरचा आगामी महापौर काँग्रेसचाच असेल, असा आशावाद खुद्द नाना पटोले यांनी व्यक्त केला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात विलक्षण अस्वस्थता पसरली आणि काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे, दिलीप कोल्हे यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन मेळाव्याची तारीखही निश्चित केली. शुक्रवार, 25 मार्च रोजी पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचे नियोजन ठरले होते.

या मेळाव्यात सध्या शिवसेनेेत असलेले माजी आ. दिलीप माने यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील अनेकजण राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपल्यासमक्ष आघाडीतील नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत आल्यास एकमेकांच्या पक्षांची फोडाफोडी करायची नाही या महाविकास आघाडीतील समझोत्याला तिलांजली दिली जाणार आणि त्याचे खापर आपल्यावर फोडले जाईल या भीतीने पवारांनी आपला दौरा लांबणीवर टाकल्याचे कळते. आघाडी घटक पक्षांतील सोडून अन्य पक्षांतील नेते, कार्यकर्ते जर आपल्यासमक्ष राष्ट्रवादीत येणार असतील तर आपण त्यांचे स्वागत करू, असे पवारांनी पदाधिकार्‍यांना कळविल्याचे समजते. एकंदर आघाडी धर्मावरून पवारांचा दौरा लांबणीवर पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मेळावा लांबणीवर पडल्याने स्थानिक नेत्यांची निराशा झाली आहे. याशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छिणार्‍यांचाही चांगला हिरमोड झाला आहे.

..तर ‘त्यांचा’ प्रवेश पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत

आघाडीच्या घटक पक्षांतील लोकांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या उपस्थितीत नको, अशी भूमिका घेत शरद पवारांनी आपणाऐवजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम घ्यावा, अशी सूचना केल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आघाडीतील नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.

Back to top button