सोलापूर : सांगोला तालुक्यातील कोळात 300 एकर वनक्षेत्र जळाले : प्राणी, पक्षी झाले सैरभैर | पुढारी

सोलापूर : सांगोला तालुक्यातील कोळात 300 एकर वनक्षेत्र जळाले : प्राणी, पक्षी झाले सैरभैर

सोलापूर / सांगोला : पुढारी वृत्तसेवा : कोळा (ता. सांगोला) येथील 300 एकरांतील वनक्षेत्राला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात झाडे जळाली. या आगीची वनातील प्राणी, पक्ष्यांनाही इजा पोहोचली.

मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोळा गावाच्या दक्षिणेला कोंबडवाडी ते तिप्पेहळी रस्त्यालगत वन विभागाचे क्षेत्र आहे. येसनखडीचा डोंगर पेटल्याने वन विभागाचे तीनशे एकर क्षेत्र जाळून खाक झालेे. दोन वर्षांपूर्वी लावण केलेल्या तसेच अन्य झाडांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याने झाडे जळून खाक झाली आहेत व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी गावातील संतोषभाऊ करांडे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते, वन विभागाचे काही कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत होते; मात्र कडक उन्हामुळे आग पसरत गेली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता.

सांगोला तालुक्यात झाडे जाळणे, झाडांची तोड करण्यापासून वनविभाग रोखू शकत नाही, अशी स्थिती आहे. वनपरिक्षेत्र अधिकार्‍यापासून ते वनमजूर कोणीच कामावर सापडत नाहीत. तेथे केवळ कंत्राटी वनमजूरच कामावर पाहावयास मिळतात. सध्या मार्चएंड असल्याने वनपालापासून ते वनरक्षक ठेकेदाराच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे या वनांना कोणीच वाली नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे.

कोळा भागात वनीकरणला अचानक दुपारी आग लागल्याचे आमच्या फिरतीवर असणार्‍या कर्मचार्‍यांच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आले. यामुळे वनरक्षक वनिता इंगोले, वन कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

– व्ही. डी. बाटे , वन अधिकारी सांगोला 

आग लागली का लावली?

आग लागली त्यावेळी वनपाल, वनरक्षक कोठे होते? वनमजूर काय करीत होते? तालुक्यात सध्या वनक्षेत्राला कोणी वालीच नाही. वन विभागाच्या जबाबदार अधिकार्‍याचे फोन बंद होते. त्यामुळे आग लागली की लावली, हे मात्र समजू शकले नाही.

Back to top button