बार्शी :  कोरेगाव जि.प. शाळेत शिक्षकाची नियुक्ती | पुढारी

बार्शी :  कोरेगाव जि.प. शाळेत शिक्षकाची नियुक्ती

बार्शी : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अखेर रिक्त शिक्षकाच्या जागेवर एका शिक्षकाची नियुक्ती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत ‘पुढारी’च्या अंकात वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या वृत्तांची दखल घेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकाची नियुक्ती झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. या निर्णयाचे शिक्षक, पालकांमधून स्वागत होत आहे.

कोरेगाव येथे एकाच खोलीत चार इयत्तांचे वर्ग एकच शिक्षक गत दहा महिन्यांपासून चालवत होते. तब्बल 75 विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत दै. ‘पुढारी’च्या गुरुवारच्या अंकात सडेतोड व वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. वृत्त प्रकाशित होताच तालुका व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. हा दुर्लक्षित विषय ऐरणीवर आला होता. कोरेगावसह बार्शी तालुक्यातील 18 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याची बाबही समोर आली होती. वृत्त प्रकाशित होताच पालकांसह ग्रामस्थांनीही खंबीर भूमिका घेऊन शिक्षक तातडीने द्यावा, या मागणीसाठी जोर लावला होता. त्यामुळे शिक्षक भरण्याबाबतच्या हालचालींना गती आली होती.

येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 75 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत शैक्षणिक नुकसान होत होते. 30 मे 2021 ला या शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले होते. मात्र, तब्बल दहा महिन्यांपासून या शाळेत एकच शिक्षक ज्ञानदानाचे काम करत होते. ही गंभीर तेवढीच विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान करणारी बाब उजेडात आल्यावर प्रशासन गतिमान झाले होते.

तालुका शिक्षण विभागाच्यावतीने या शाळेत शिक्षक दिल्यामुळे तात्पुरती का असेना गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून शिक्षक देण्यास भाग पाडल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Back to top button