सोलापूर : झेडपीची वसतिगृहे पडलीत धूळखात | पुढारी

सोलापूर : झेडपीची वसतिगृहे पडलीत धूळखात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शहरात तीन वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. मात्र कोरोना परिस्थितीमुळे ही वसतिगृहे गेल्या दोन वर्षांपासून धूळखात पडून राहिली आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला नसल्याने ऐन परीक्षा काळात ही वसतिगृहे ओस पडल्याचे दिसून येत आहे.

सोलापुरातील अत्यंत महत्त्वाच्या पार्क चौकात जिल्हा परिषदेचे तीन मजली भव्य वसतिगृह आहे. या वसतिगृहात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. अत्यंत माफत दरात याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची पहिली पसंती या वसतिगृहास असते. अकरावीपासून पुढे उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश देण्यात येतो. नेहरू वसतिगृहात प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आज यश संपादन केले आहे. या वसतिगृहातील विद्यार्थी देशभरात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे या वसतिगृहाचा शैक्षणिक लौकिकही वाढला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर मुलींनाही शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शेळगी येथे खास मुलींसाठी वसतिगृह सुरू केले. येथील वसतिगृह मुलींना प्रवेश देण्यासाठी अपुरे पडत असल्याने तत्कालीन समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना निकंबे यांनी रंगभवन येथे जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मुलींचे वसतिगृह सुरू केले.

या वसतिगृहासही मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वसतिगृहात मुलींसाठी राहण्याबरोबरच जेवणाचीही सोय माफक दरात करण्यात आली. ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेली दोन वसतिगृहे ही विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरली. यामुळे ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित वातावरणात राहून शिकता येत आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांपासून वसतिगृहावर निर्बंध आहेत. राज्य शासनाकडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाची दारे खुली करण्यात आली आहेत. मात्र वसतिगृहाची दारे अजूनही बंदच असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत.

सध्या परीक्षेचा काळ आहे. परीक्षेसाठी ग्रामीण भागातून दूरवरून विद्यार्थ्यांना शहरात यावे लागत आहे. प्रवासाकरिता खासगी वाहनांचा आधार विद्यार्थ्यांना घ्यावा लागत आहे. परीक्षेस वेळेत पोहोचणार की नाही, अशी भीती अनेक विद्यार्थ्यांत आहे. अशा परिस्थितीत परीक्षेच्या काळात तरी विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार कोरोना नियम पाळण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची मुभा देण्यात यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

घाणीच्या साम्राज्याने परिसरात दुर्गंधी

कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरात चालविण्यात येणारी तीन वसतिगृहे विद्यार्थ्यांविना ओस पडली आहेत. येथील वर्दळच थांबली असल्याने वसतिगृहांच्या परिसरात कमालीचे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. किमान या वसतिगृहांची स्वच्छता तरी होणे आवश्यक झाले आहे.

अशी झाली वसतिगृहांची अस्वथा

  • शौचालयांची दारे तुटून पडली
  • विद्यार्थ्यांच्या खोलीत कपड्यांचा खच भरला
  • परिसरात वाढली झाडेझुडपे
  • मोकाट कुत्रे, सरपटणार्‍या प्राण्यांचा वाढला वावर
  • वसतिगृहांतील साहित्याची झाली मोडतोड
  • वसतिगृहांच्या परिसरात बेघरांचे वाढले वास्तव्य
  • वसतिगृहांची देखरेख व व्यवस्थापन बिघडले

कोरोना निर्बंध कमी झाले आहेत. परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय याठिकाणी करण्यात यावी. वसतिगृहांची स्वच्छता करण्यात यावी. असे जि.प. सदस्य अरुण तोडकर म्‍हणाले.

Back to top button