

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून परीक्षेची तयारी सुरु आहे. 13 हजार परीक्षार्थी 21 केंद्रावर टीईटी (टीचर इलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षा देणार आहेत.
परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. यावेळी टीईओ परीक्षा नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यावर सहसचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
तीन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षा होत असल्याने जिल्ह्यातील 13 हजार परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून 21 केंद्रावर परीक्षेचे नियोजन केले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखांवर केंद्र तपासणीसाठी जबाबदारी दिली आहे. तसेच महापालिकेचे प्रशासनाधिकारी, पोलीस आयुक्त यांची टीईटी परीक्षा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे या परीक्षेवर महापालिका अधिकार्यांचा वॉच राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
विधानसभा निवडणूक लागली आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत; मात्र यातील ज्या अधिकारी, कर्मचार्यांकडे शिक्षक पात्रता परीक्षेची जबाबदारी येईल, त्या कर्मचार्यांना परीक्षेवेळी सूट देण्यात यावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यात सर्वाधिक परीक्षार्थी आपल्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू केली आहे. प्रत्येक अधिकार्यांवर विविध जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पडतील.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक