राजेश टोपे : शेतकर्‍यांच्या द्राक्षाला दर मिळवून देण्यासाठी ‘वाईन’ला परवानगी | पुढारी

राजेश टोपे : शेतकर्‍यांच्या द्राक्षाला दर मिळवून देण्यासाठी ‘वाईन’ला परवानगी

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने मॉल, किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे शेतकर्‍यांच्या द्राक्षाला चांगला भाव मिळावा, हा हेतू आहे. वाईन प्या, असे आरोग्य विभाग सांगत नाही, सरकार दारू पिण्याचे समर्थन किंवा चालना देत नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

सोलापूर दौर्‍यावर आले असता रविवारी पत्रकारांशी संवादावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवारसह पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने दुकानांमधून वाईन विक्रीस परवाना दिल्याने विरोधकांकडून आरोप होत आहे. याबाबत टोपे म्हणाले, सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. विविध कृषी मालाला योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी, द्राक्षांचे उत्पन्न वाढावे. द्राक्षापासूनच वेगवेगळ्या वाईन तयार होत असतात.

यासाठी वाईन विक्रीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीच राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य लोकांनी वाईन प्यावी, असा राज्य शासनाचा हेतू नाही. टोपे म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत चालले आहे. याबाबतीत प्रत्येक जिल्ह्यात या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

मार्च महिन्यात कोरोना रुग्णांत घट

राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले असून उपाययोजनेसाठी राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना वाढीचा वेग स्थिर असलातरी येत्या मार्च महिन्यामध्ये कोरना रुग्णांच्या संख्येत घट होईल. मेडिकल रिसर्च कौन्सिल यांनी कोरोना प्रतिबंधासाठी अनेक सूचना केल्यानंतर त्यांनीही अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांच्या नियम अटीनुसारच राज्यात स्टास्क फोर्स काम करीत आहे. मास्क वापरण्याबाबतही तेच खुलासा करतील, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Back to top button