सोलापूर मध्ये दोघा घरफोड्यांना अटक; १७ चोर्‍या उघडकीस | पुढारी

सोलापूर मध्ये दोघा घरफोड्यांना अटक; १७ चोर्‍या उघडकीस

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोड्या करणार्‍या अनंत ऊर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण (वय 38, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) व किसन कुबेर काळे (वय 22, रा. कुंभारी, पारधी कॅम्प, ता. दक्षिण सोलापूर) या दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून 17 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 10 लाख 48 हजार 150 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिली.

शहरात मागील ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस आयुक्‍त हरिष बैजल यांनी गुन्हे शाखेस आदेश दिले होते. या आदेशावरून गुन्हे शाखेचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक विनायक बर्डे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, सराईत घरफोड्या करणारे दोन गुन्हेगार हे चोरीचे सोने विकण्यासाठी सराफ बाजारात येणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला सराफ बाजारातून अनंत चव्हाण व किसन काळे या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह घरफोड्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही आरोपींनी आपल्या साथीदारांच्या मदतीने दिवसा व रात्री विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 अशा 17 घरफोड्या केल्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या 17 घरफोड्यांमधील 30 तोळ्याचे सोन्याचे दागिने व सव्वा किलो चांदीचे दागिने असा 10 लाख 48 हजार 150 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त हरिष बैजल, पोलिस उपायुक्त बापू बांगर, पोलिस निरीक्षक संजय साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे, हवालदार दिलीप नागटिळक, संतोष फुटाणे, पोलिस नाईक शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, कोळी, वाळके, जावळे तसेच हवालदार अशोक लोखंडे, भोसले, मुळे, पोलिस कॉन्स्टेबल अर्जून, शेख, कानडे, निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे, चालक ढेकणे, काकडे यांनी पार पाडली.

Back to top button