खासगीत झापले, जाहीर कार्यक्रमात केले कौतुक; मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त

खासगीत झापले, जाहीर कार्यक्रमात केले कौतुक; मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी वारीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजनाचा आढावा घेतला. वारकर्‍यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला खासगीत झापले, मात्र जाहीर कार्यक्रमात प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केलेे. त्यामुळे प्रशासनाचेे नियोजन योग्य होते की चुकले होते, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला. या दौर्‍यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गर्दीमुळे आपला ताफा वारीतच सोडून खासगी गाडीतून सोलापूर गाठल्याची चर्चाही आता जोरदार रंगली आहे.

आषाढी वारीचे नियोजन सुरू असताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे प्रशिक्षणासाठी रजेवर होते. वारीला दोनच दिवस राहिले असताना ते रुजू झाले. वारीच्या नियोजनात अनेक त्रुटी राहिल्याने वारकर्‍यांना समस्यांचा सामना करावा लागला. हीच बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर शिंदे यांचा पारा चांगलाच चढला होता. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांसह सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले.

जिल्हाधिकार्‍यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही रजेवर होता हे खरे असले तरी तुमची यंत्रणा काय झोपली होती का, असे खडे बोलही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. त्यामुळे या ढिसाळ नियोजनाला मुख्यमंत्री कोणाला जबाबदार धरणार आणि कोणावर कारवाई होणार, अशी भीती अनेकांना होती, तर काही अधिकार्‍यांना याचे दडपणही आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापूजेनंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात मात्र अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खासगीत प्रशासनाला झापझाप झापले आणि जाहीर कार्यक्रमात मात्र तोंडभरून कौतुक केले, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

पालकमंत्र्यांनी खासगी गाडीतून गाठले सोलापूर

आषाढी वारीनिमित्त होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे अनेक गंमतीशीर घटनाही घडतात. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आषाढीच्या महापूजेनंतर पंढपुरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होते. यावेळी देाघांचाही शासकीय गाड्यांचा ताफा मोठा होता. याचा सर्वसामान्य वारकर्‍यांना त्रास नको म्हणून पालकमंत्री विखे-पाटील यांनी विश्वासू कार्यकर्त्यांना घेऊन थेट दुचाकीवरुन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री सोलापूरला तातडीने निघाले. तोपर्यंत विखे-पाटील यांचा ताफा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे समयसूचकता लक्षात घेत विखे-पाटील यांनी तातडीने खासगी गाडीतून सोलापूर गाठले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news