सुपुष्पा फुलल्यामुळे १६ वर्षांनी महाबळेश्वरच्या सौंदर्याला चार चाँद!

सुपुष्पा फुलल्यामुळे १६ वर्षांनी महाबळेश्वरच्या सौंदर्याला चार चाँद!

महाबळेश्वर ; प्रेषित गांधी : महाबळेश्वरचे वेड लावणारे निसर्गसौंदर्य सर्वांनाच घायाळ करून जाते. या सौंदर्याला सुपुष्पा मुळेे आणखी चार चाँद लागले आहेत. तब्बल सोळा वर्षांनंतर येथील कॅसल रॉक आणि सावित्री पॉईंटवर फुललेल्या या अनोख्या फुलांची नजाकत थक्क करणारी आहे. या वनस्पतीचे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठे अप्रूप आहे. जैवविविधता संवर्धनाचा भाग म्हणून या फुलांचे संरक्षण करणारी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महाबळेश्वर हे निसर्गसौंदर्याने नटलेले जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गाची मनमोहक रूपे पर्यटकांना मोहवून टाकत असतात. त्यामुळे जगभरातील पर्यटक 12 महिने या पर्यटनस्थळी हजेरी लावत असतात. महाबळेश्वरचे हे सौंदर्य सुपुष्पा फुलांच्या बहराने आणखी खुलले आहे.

कारवी वनस्पतीच्या अनेक प्रजाती पश्चिम घाटाच्या डोंगररांगांत आढळून येतात. कारवीच्या सर्व प्रजाती या प्रदेशनिष्ठ आणि अनोख्या सौंदर्याने जगभरात प्रसिद्ध आहेत. 3 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे आणि 12 वर्षांनंतर फुलांचा बहर येण्याची अनोखी निसर्गसाखळी असते. या प्रजातींपैकी 'स्ट्रॉबीलँथस स्क्रॉबीक्युलाटस' ही प्रजाती तब्बल सोळा वर्षांनंतर महाबळेश्वरमध्ये बहरली आहे. या वनस्पतीला मराठीमध्ये 'सुपुष्पा' किंवा 'पिचकोडी' असे म्हटले जाते. महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी एक सुवर्ण व मनमोहक नजारा आपणास पाहावयास मिळत आहे.

सुुपुष्पाची रंगसंगती फिक्कट जांभळी…

सुपुष्पा फुलांची रंगसंगती फिक्कट जांभळ्या रंगामध्ये आढळते. ही फुले आकाराने छोटी असून साधारणत: 0.7 ते 2 सें.मी.पर्यंत असतो. ही फुले गुच्छ स्वरूपात एकत्रितपणे उमलतात. सुपुष्पाची महाबळेश्वरमध्ये जी फुले आढळली आहेत, ती स्ट्रॉबीलँथस स्क्रॉबीक्युलाटस या प्रजातीची आहेत.

सुुपुष्पा सौंदर्य खुलवणारी; वनस्पतीच्या 22 प्रजाती

सुपुष्पा फुले सध्या तरी नैसर्गिक सौंदर्य खुलवताना दिसत आहेत. या फुलांच्या 22 प्रजाती असून त्याची कुठेही निर्यात अथवा विक्री होत नाही. औषधी म्हणूनही ही वनस्पती सध्या तरी वापरली जात नाही. वन विभागाकडून या फुलांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सुपुष्पा ही वनस्पती महाळेश्वरसह वासोटा व प्रतापगड येथेही आढळते. 1884 मध्ये पहिल्यांदा ही वनस्पती सातारा जिल्ह्यात आढळली होती. या वनस्पतीचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी सध्या उमललेली सुपुष्पा ही एक आहे. ही वनस्पती दगडावर उमलून येते. वन विभागाकडून या दुर्मीळ वनस्पतीचे संरक्षण चांगल्याप्रकारे झाल्याने अजूनही ही वनस्पती बहरून येत आहे.
– महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा

logo
Pudhari News
pudhari.news