सुट्टीचा मुहूर्त साधत सातारकरांची खरेदी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या प्रकाशपर्वास गुरुवार दि. 9 पासून प्रारंभ होत असून यंदा उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. राजवाडा, खणआळी, राजपथ, पोवई नाका, बसस्थानक परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. रविवारी दिवसभर आणि रात्री 11 पर्यंत लोकांची ये-जा सुरूच होती. यामुळे व्यापार्‍यांनीही रविवारी दिवस-रात्र सेवा सुरू ठेवली होती.

ग्राहकांच्या गर्दीने फुलले रस्ते…

 दीपावलीच्या खरेदीसाठी रविवारी सोने, कपडे व इलेक्ट्रिक सामानासह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. काही शाळांना सुट्या लागल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलल्याचे चित्र होते.

आकाश कंदिलांना पसंती…

 विविध आकारातील पणत्यांबरोबरच मातीचे स्टँडचे कंदील टांगते दिवे, छोटे नंदादीप विक्रीसाठी उपलब्ध झाले. कागदी, कापडी, काश्मिरी वर्क, कुंदन व भिंगाचे नक्षीकाम असलेले आकाश कंदील तसेच अ‍ॅक्रेलिक, प्लास्टिक, पारंपरिक बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांना यंदा मागणी आहे.

कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी

 दिवाळीसाठी सर्वात मोठी खरेदी ही कपड्यांची होते. त्यामुळे कापड व्यवसायिकांनी विविध व्हरायटीतील कपड्यांचा स्टॉक करून ठेवला आहे. रेडिमेड कापड विक्रीतील तेजी लक्षात घेऊन ठोक व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. खरेदीसाठी सुट्टीचा मुहूर्त साधून कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य

 इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची मागणी केल्याने उलाढाल वाढली, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे. ऑनलाईन शॉपिंगही वाढली असून ग्राहक आता घरूनच खरेदी करत आहेत.

  •  यंदा दिवाळी गुरुवार दि. 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत साजरी होत आहे. या सात दिवसांच्या उत्सवाची जय्यत तयारी घरोघरी सुरू झाली आहे.
  •  गुरुवारी वसुबारसने दिवाळी सणाची सुरुवात होत आहे. शुक्रवारी धनत्रयोदशी, रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी- कुबेर पूजन होणार आहे. मंगळवारी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा असणार आहे.
  •  बुधवारी भाऊबीज होणार आहे. सलग सात दिवस दिवाळीचा उत्सव सुरू राहणार असल्याने आबालवृद्धांमध्ये यंदाच्या दिवाळीचा प्रचंड उत्साह आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news