

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या घाडगेवाडी गावाने एकीच्या बळावर ग्रामविकासाची चळवळ हाती घेत गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यात सुंदर गाव योजनेत प्रथम क्रमांक मिळवून घाडगेवाडी गावाने डंका वाजवला आहे.
आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे. ही बाब लक्षात घेऊन घाडगेवाडी ग्रामस्थांनी गावात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरविले. शासनाच्या आर. आर. पाटील स्वच्छ गाव स्पर्धेत सहभाग घेतल्यावर सरपंच हिरालाल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गाव एकवटलं आणि कामाला लागलं .
सर्वप्रथम गावच्या स्वच्छतेवर भर दिला. स्वच्छतेसाठी महिलांचा उत्साह पाहून तरुणही पुढे सरसावले. स्वच्छतेसोबत हगणदारी मुक्त गाव, गावातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण, संपूर्ण बंदिस्त गटर योजना, दुतर्फा लावलेली झाडे, विविध चित्रांद्वारे रंगवलेल्या भिंती, स्वच्छतेचे संदेश, स्वच्छ पाणी योजना, प्राथमिक शाळेतील डिजीटल वर्ग, ओला -सुका घनकचरा व्यवस्थापन, जलपुन:र्भरण , शोषखड्डे यासह अनेक उपक्रम राबवून तालुक्यात नावलौकिक निर्माण केला आहे.
गावात प्रकल्पातंर्गत बॅरलमध्ये ओल्या कचर्यापासून तयार झालेल्या खतात कार्बन आणि नायट्रोजन यांचे प्रमाण जास्त असते आणि वाढणार्या वनस्पतींसाठी ते एक उत्कृष्ट माध्यम असते. त्यामुळे गावाने टोमॅटो, वांगी, मिरची, कारले, भोपळा, दोडका, गवार तसेच पालेभाज्यांची रोपे परसबागेत लावून उत्पादन घेतले जाते. त्यातून प्रत्येक कुटुंबाला घरच्या घरी भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळे भाजीपाल्याबाबत गाव स्वयंपूर्ण आहे.
तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात काही योजना राबवण्याचे ठरविले त्याला मूर्त स्वरुप आले . एकीच्या बळावर गावाने कात टाकली आणि एका वर्षात आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात नाव झाले याचे समाधान आहे. यापुढेही गावची यशस्वी घौडदौड कायम राहिल.
– हिरालाल घाडगे, सरपंच, घाडगेवाडी, ता. खंडाळा