

चाफळ; राजकुमार साळुंखे : गेल्या पाच -सहा दिवसांपासून चाफळ परिसरात पडत असलेल्या पावसाने सोयाबीन, भात आडवे झाले तर हायब्रीड उभ्याच उगवण्याच्या मार्गावर आहे. भूईमुगाच्या शेंगा जमिनीतच उगवू लागल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणीचा नेहमीच बळी ठरणारा चाफळ विभागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटाचा सामना करत आहे.
गत पाच -सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाची अवस्था बिकट झाली असून, सतत पडणार्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके आडवी होऊन कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विभागातील शेतकरी आता पाऊस थांबण्यासाठी साकडे घालू लागला आहे. शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
चाफळ विभागात चार -पाच दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. जूनच्या अखेरीला खरिपाच्या पिकांना पावसाची अत्यंत गरज सुद्धा होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता.त्यामुळे पाऊस पडावा यासाठी साकडं घालत होता.येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं म्हणत होता. पावसानंही बळीराजाची हाक ऐकली आणि विभागात दमदार एन्ट्री केली.त्यामुळे बळीराजा काही काळ सुखावला होता.पण हे सुख काही दिवसांपुरतेच होते.कारण गत दोन महिन्यांपासून पडणारा पाऊस काही केल्या थांबायचं नावच घेईना. उलट गेल्या पाच दिवसांपासून विभागात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे पैसा खोटा होऊन पाऊस मात्र मोठा आलेला आहे.विभागातील काही ठिकाणची हायब्रीड उभ्या उभ्याच पुन्हा उगवण्याच्या मार्गावर आहेत. तर भात,भूईमूग काढण्यायोग्य होऊनही सततच्या पावसाने काढता येत नाहीत. मुसळधार पावसाने भूईमुगाच्या शेंगा जमिनीतच उगवण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुढे हा पाऊस असाच राहिला आणि शेतात पाणी भरून राहणार आहे.
हरभरा, ज्वारी, गहू पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण काढणी योग्य झालेली पिके पावसामुळे काढता येत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांपुढे मोठे संकट आहे. विभागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असून आता पाऊस थांबण्याची गरज आहे. दहा दिवसांपासून कोंदट वातावरण असल्याने व पिकांना ऊन मिळत नसल्याने पिकांवर परिणाम होऊन ज्वारी काळी पडत आहे.