

सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून म्हसवड येथे औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करुन घेत त्याचा अपहार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील असून याप्रकरणी म्हसवड, जि. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
प्रमोद पांडूरंग सपाटे (रा.इचलकरंजी), नितीन बाबूराव गाट (रा. बागल चौक, कोल्हापूर), प्रशांत श्रीकांत बडवे (रा. हातकणंगले जि.कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, म्हसवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी 30 मे 2019 साली गुन्हा दाखल झाला आहे. राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित म्हसवड ता. माण या नावाने संस्था असून त्याचे चेअरमन, संचालक यांनी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून औद्योगिक प्रकल्पासाठी 1 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. पैसे मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये घोटाळा करुन पैसे हडप केले. 52 आठवड्यात प्रकल्प पूर्ण करण्याची शासनाची अटक होती. मात्र कोणतेही काम त्यांनी केले नाही. लेखापरीक्षणामध्ये ही बाब समोर आल्यानंतर संशयितांवर फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत होते. दि. 23 रोजी संशयितांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी भोसले करत आहेत.