सातारा : सत्तेची मस्ती आली की जनतेतून उठाव होतो – आ. जयकुमार गोरे

सातारा : सत्तेची मस्ती आली की जनतेतून उठाव होतो – आ. जयकुमार गोरे
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा :  सत्ता असताना मस्ती अंगात शिरली की यथावकाश जनतेतून उठाव होतो. कराड उत्तरमध्ये गेल्या अडीच वर्षांत पालकमंत्र्यांनी नको इतका त्रास दिलाय. त्यांच्या जाचाला कंटाळून अनेकजण भाजपची विचारधारा स्वीकारत आहेत. इथल्या जनतेने आता भाकरी फिरवून कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकर्‍यांच्या व्यथा जाणणारा भाजपचा आमदार निवडून द्यावा. जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीत भाजपचा झेंडा फडकवावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करवडी येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, सागर शिवदास, भीमरावकाका पाटील, सुरेश पाटील, महेश जाधव, महेंद्र डुबल, दीपाली खोत, सुजाता जाधव, चंद्रकांत मदने, प्रमोद गायकवाड, सरपंच सौ. पिसाळ उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत. जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले. सातारा जिल्ह्याने त्यांची पाठराखण केली. मात्र त्यांनी जिल्ह्याला काहीच दिले नाही. आपला वापर करुन स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला. जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज रखडवले. जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातले. रयत शिक्षण संस्थेत मनमानी सुरु आहे. त्यांच्या कळपातील इतर नेतेही तसेच वागतात. कराड उत्तरचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणार्‍या माजी पालकमंत्र्यांनी इथल्या हणबरवाडी धनगरवाडी पाणी योजनेसह अनेक विकासकामे केली नाहीत. त्यांना शेतकर्‍यांच्या यातना माहित नाहीत. त्यांनी फक्त सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना त्रास द्यायचे काम केले. यापुढे मात्र आमच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी सरकार आणि आम्हा पधाधिकार्‍यांची ताकद उभी आहे. कराड उत्तरमधील पाणी योजना भाजपच पूर्ण करणार आहे.

आ. गोरे म्हणाले, विश्वासघाताने पवारांनी आणलेले महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यांचे अकार्यक्षम मुख्यमंत्री घरी बसले आहेत. राज्यात आता भाजप आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचे सरकार आले आहे. हे सरकार जनतेसाठी त्वरित निर्णय घेत आहे. विकासकामांसाठी लागेल तो निधी देत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातूनही गावोगावी कोट्यवधींचा निधी आहे. सर्वत्र विकासाचे महापर्व उभे रहात आहे. कराड उत्तरमधील जनतेने आता भाजपाच्या पाठीशी एकसंघपणे उभे रहावे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात धैर्यशील कदम यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या अडीच वर्षात या भागाची झालेली अधोगती, कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यापुढे मात्र अन्याय सहन केला जाणार नाही, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.

अनेकांना झालेला अपमान आणि अन्याय जिव्हारी लागलाय…

गेल्या दोन दिवसातील संवाद यात्रेदरम्यान गावोगावच्या लोकांनी झालेल्या अपमानाचा पाढा वाचला. अनेकांचा स्वाभिमान दुखावला आहे. अन्याय झालेलेे अनेक जण बदला घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारुन या भागाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लवकरच त्या सर्वांना भाजपमध्ये सामावून घेतले जाईल, असेही आ. गोरेंनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news