सातारा : ‘रयत’चे धुमशान आठवडाभरात

सातारा : ‘रयत’चे धुमशान आठवडाभरात
Published on
Updated on

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा
माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर संस्थापक असलेल्या रयत सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या आठ दिवसांत केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय कारखान्यासाठी पुढील महिन्यात मतदान होण्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता या कारखान्याची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध होणार की पुन्हा एकदा उंडाळकर कुटुंबात सत्ता संघर्ष होणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सन 1996 साली रयत कारखान्यांची स्थापना केली होती. त्यानंतर मागील 26 वर्षे कारखान्याची निवडणूक नेहमीच बिनविरोध झाली आहे. मात्र, मागील वर्षी विलासराव पाटील उंडाळकर यांचे निधन झाले आणि राजकीय परिस्थिती पूर्णपणे पालटली. तत्पूर्वीच 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत उंडाळकर कुटुंबात सर्वप्रथम सत्ता संघर्ष झाला होता. अ‍ॅड. उदयसिंह पाटील व अ‍ॅड. आनंदराव पाटील ऊर्फ राजाभाऊ यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर मागील आठ ते नऊ महिन्यांत प्रथम जिल्हा बँक निवडणूक, शामराव पाटील पतसंस्था, उंडाळे सोसायटी, ज्योतिर्लिंग दूध संस्था या निवडणुकीत उंडाळकर चुलत बंधूनी एकमेकांना विरोध केला. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर रयत कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडित होण्याची दाट शक्यता आहे.

रयत कारखान्याची निवडणूक आठ दिवसांत जाहीर होईल, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात मतदान व मतमोजणी होण्याची चर्चा असून कारखान्यावर कोणाची पकड राहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रयत कारखान्याची अंतिम मतदार यादी निश्चित झाली आहे. याशिवाय सहकार प्राधिकरणाची अन्य तयारीही यापूर्वीच पूर्ण झाली असल्याने आठ दिवसात निवडणूक जाहीर होणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

डॉ. अतुल भोसले गट कृष्णा कारखाना निवडणुकीत राजाभाऊंनी केलेल्या मदतीची परतफेड असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील पतसंस्थेच्या प्रचाराबरोबर रयत सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराचा ही धडाका लावला आहे. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनीही रयत कारखान्यासह सर्व संस्थांचे संचालक, कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकार्‍यांना रयत कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 26 वर्षांनी प्रथमच रयत कारखान्यांची निवडणूक होणार, अशी सध्यस्थिती पहावयास मिळत आहे..

डॉ. अतुल भोसले समर्थक प्रचारात

राजाभाऊ पाटील यांनी रयत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात संपर्क दौरे करून उमेदवार निश्चित केल्याचेही समजते. त्यांना डॉ. अतुल भोसले यांचे सहकार्य मिळत आहे. शामराव पाटील पतसंस्था निवडणुकीत नांदगाव येथील प्रचार सभेत कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावरूनच रयत कारखाना निवडणुकीत भाजपा नेते डॉ. अतुल भोसले समर्थकांची भूमिका काय असणार ? हे स्पष्ट होत आहे.

जयसिंग बापू पुतण्याविरोधात प्रथमच थेट प्रचारात

राजाभाऊ पाटील यांनी 2017 पासून अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना थेट विरोध केला होता. मात्र, राजाभाऊ यांना पाठिंबा असणारे त्यांचे वडील व स्व. विलासराव पाटील यांचे सख्खे बंधू जयसिंगराव पाटील यांनी थेट प्रचारात उडी घेतली नव्हती. आजवर विरोध असला तरी ते थेट प्रचारात उतरले नव्हते. स्व. उंडाळकर व जयसिंग बापू हे राम – लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचित होते. मात्र स्व. उंडाळकर यांच्या पश्चात त्यांनी शामराव पाटील पतसंस्था निवडणुकीत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेल विरोधात प्रथमच उघडपणे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळेच आता रयत कारखान्यांची निवडणूक अटळ असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news