सातारा : म्हणे यांनी अडवलं; हे वॉचमन आहेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

सातारा : म्हणे यांनी अडवलं; हे वॉचमन आहेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला
Published on
Updated on

वरकुटे-मलवडी; पुढारी वृत्तसेवा : सध्या पोलिस आणि महसूलची भीती दाखवून लुबडायचं काम चालू आहे. माण तालुक्यातून त्यांना उत्तर द्या, प्रत्येक वेळी फलटणवरून मला बोलावं लागतं याची दखल अजितदादा तुम्ही घ्या, मी आहेच, मी कुणाला घाबरत नाही. हे एक आमदार व आमचा निर्बुद्ध खासदार यांना भविष्यात रोखलं नाही तर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान करणार आहेत. संवाद यात्रेत मोदींचा वाढदिवस म्हणून साजरा करताना जनतेला चांगला मेसेज देण्याऐवजी ठोकून काढूची भाषा एका राष्ट्रीय पक्षाला कशी चालते हाच मोठा प्रश्न आहे. म्हणे रामराजे भाजपमध्ये येणार होते. पण आम्हीच अडवलंय, हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? का तुम्ही पक्षाचे वॉचमन आहात?, असा सवाल विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आ.जयकुमार गोरे यांना केला.

मार्डी, ता. माण येथील शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलताना आ. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मला काळे झेंडे दाखवा नाहीतर अजून काही दाखवा, तुम्हाला पाणी मिळत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही. मी काळ्या झेंड्याना भीत नाही.कॉरिडॉर जिल्ह्याची आहे. ती कॉरिडॉर मी पळवली नाही. दुष्काळी भागात कॉरीडॉर झाली पाहिजे हा माझा आग्रह आहे. सदाशिवराव पोळतात्यांच्या काळात गटातटाचे राजकारण कधीच झाले नाही. त्यामुळे सर्वांनी तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपापसातील हेवे दावे संपवून टाका, तुम्हांला कोणीही रोखू शकत नाही, असे आवाहन त्यांनी केले.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, माण हा जिल्ह्याच्या उगवत्या दिशेला आहे. त्यामुळे माणमध्ये राष्ट्रवादीचा सूर्य उगवला पाहिजे. माण ही बुद्धीवंतांची आणि शूरविरांची खाण आहे. त्यामुळे इथे त्याला शोभेल असा आमदार तुम्ही द्या, असे आवाहन त्यांनी केले. प्रभाकर देशमुख म्हणाले, जिहेकठापूरचा पाहिला आराखडा स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव पोळ तात्यांनी केला. माण सुजलाम सुफलाम करण्यासाठी पाहिला प्रयत्न तात्यांनी केला. त्यामुळे जिहे-कठापूरचे खरे जनक सदाशिव पोळ तात्या आहेत.खोट्या कामाचे श्रेय घ्यायची पद्धत माणमध्ये काही दिवसांपूर्वी सुरु झाली आहे. आम्ही कधीही लबाडीचे राजकारण करणार नाही. आम्हाला विकासाचे आणि बेरजेचे राजकारण करायचे आहे. माण मधील शेतकरी हा जास्तीत जास्त दुग्धव्यवसायावर अवलंबून असतो. परंतु दुधाला भाव मिळत नाही. त्याकरता आमचा आग्रह आहे. दुधाला प्रतिलीटर 70 ते 80 रुपये भाव मिळाला पाहिजे. म्हसवडला औद्योगिक कॉरिडॉर झाला तर लाखो युवकांना रोजगार मिळेल आणि येथील बेरोजगारी कायमची दूर होईल. त्यामुळे औद्योगिक कॉरीडॉर म्हसवडलाच झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटेल तो प्रयत्न करू, अशी गाव्ही प्रभाकर देशमुख यांनी दिली.

यावेळी प्रदिप विधाते, संदीप मांडले, बाळासाहेब सोळसरकर, सुभाषराव शिंदे, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, नितीन भरगुडे-पाटील, अभय जगताप, मनिषा काळे, प्रा.कविता म्हेत्रे, सागर पोळ, महेश जाधव, दिलीप तुपे, किशोर सोनवणे उपस्थित होते. प्रास्तविक सोनाली पोळ यांनी केले. आभार अभय पोळ यांनी मानले.

म्हसवड एमआयडीसीला माझा विरोध नाही..

केंद्रातील मागील सरकारने एमआयडीसी मंजूर करताना म्हसवडची अधिसूचना काढली होती. त्यावेळीही मी विरोध केलेला नव्हता व आताही माझा म्हसवड एमआयडीसीला विरोध नाही, असे स्पष्ट मत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. दरम्यान उत्तर कोरेगाव हा दुष्काळी भाग असून तेथील शेतीला उद्योग, नोकरी, व्यवसायाची जोड मिळाली तर लोक चांगल्या प्रकारे जीवन व्यथित करु शकतात, ही माझी सुचना होती. हेच काम मी फलटणमध्ये केले आहे, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news