सातारा : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना थोरली – मंत्री शंभूराज देसाई

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना थोरली आहे. कारण आमच्याकडे 55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार आहेत. त्यामुळे आमचीच शिवसेना थोरली असून दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री ना. शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.

ना. देसाई पुढे म्हणाले, जिल्हा नियोजनच्या अनुषंगाने 411 कोटी रुपयांचा आराखडा पाठीमागे मंजूर केला आहे. राजकीय घडामोडीनंतर काही कामे स्थगित ठेवली होती. त्याचाही आढावा घेतला आहे. लवकरच कॅबिनेटची बैठक होईल, त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आमदार निधी, डोंगरी विकास निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्याचे काम जिल्हाधिकार्‍यांनी सुरू ठेवले आहे. कालावधी कमी असल्याने स्थगिती आदेशाचा फेरविचार होईल. त्यावेळी जिल्हा परिषद व नगरविकासची कामे, सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा लोड वाढणार आहे. त्यामुळे आमदारांकडून कामे मागवून त्याला तातडीने प्रशासकीय मंजूर्‍या देण्याचे आदेेश दिले आहेत. तसेच सर्वसाधारण चर्चेबरोबर विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. कोविडच्या संसर्गामुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला. निर्बंध हटवल्यानंतर दहिहंडीनंतर आता गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. मंडळांना आवश्यक त्या परवानग्या एक खिडकी योजनेप्रमाणे दिल्या आहेत. पोलिस यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतर्क आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींच्या बैठका घेतलेल्या आहेत, असेही ना. देसाई म्हणाले.

डॉल्बीबाबत विचारले असता ना. देसाई म्हणाले, डॉल्बीला आवाजाची जी मर्यादा न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्या मर्यादेच्या आधिन राहून वाद्य वाजवायला प्रशासनाची हरकत नाही. पंरतु, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व उल्लंघन होईल, अशा पध्दतीने कृती झाल्यास त्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तालीम संघावरील कार्यक्रमात वाजलेल्या डॉल्बीचे खात्रीशीर मोजमाप समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल. राज्यस्तरावर डॉल्बीबाबत परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, असेही ना. देसाई म्हणाले.

कास पठाराच्या अनधिकृत बांधकामाबाबत आ. शिवेंद्रराजेंनी हा विषय मंत्री म्हणून मला सांगितला नाही. कदाचित ते वर हायकंमाडशी बोलत असावेत. त्यामुळे मला याबाबतची अपुरी माहिती आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जावून आले आहेत ते मला अहवाल देतील. जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अतिरिक्त पोलिस प्रमुख अजित बोर्‍हाडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news