सातारा : बोर्ड परीक्षा गुणवत्तेबाबत साशंकता

File Photo
File Photo
Published on
Updated on

सातारा; मीना शिंदे :  बारावी बोर्ड परीक्षेवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. बारावी परीक्षेतील गुणवत्तेवर पुढील करिअरची दिशा ठरली जाणार आहे. विषय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यांवरील पडताळणीनंतर बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली जाते. असे असतानाही परीक्षेत सलग दोन्ही पेपरमध्ये चुका आढळल्या आहेत. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तरे छापण्यात आली. हिंदीच्या पेपरमध्ये गुणांकन चुकीचे छापण्यात आले होेते. वारंवार होणार्‍या बोर्ड परीक्षेतील चुकांमुळे परीक्षा मंडळाचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या कसोटीबाबतच विद्यार्थी व पालकांमध्ये साशंकता आहे.

बारावी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची कसोटी आहे. सध्या बोर्ड परीक्षा सुरू असून, विद्यार्थी अभ्यासासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. पालकही पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी आरोग्य व अभ्यासाचे वेळापत्रक सांभळताना तारेवरची कसरत करत आहेत. मात्र, परीक्षा मंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या या कठोर परिश्रमावरच पाणी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. बारावी बोर्डाच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गंभीर चुका आढल्या आहेत.

एक-एक गुणही अत्यंत महत्वाचा असताना तब्बल 6 गुणांचे प्रश्न चुकले आहेत. प्रश्नाच्या जागेवर उत्तरे छापल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. दुसर्‍या दिवशीदेखील हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचे गुणांकन चुकीचे छापल्याने राज्य परीक्षा मंडळाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक परीक्षा होणार आहे. या परीक्षेतील गुणवत्तेवरच व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. बोर्ड परीक्षेतील चुकांचा पाढा इतर परीक्षांमध्ये गिरवला गेला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता कसोटीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अनेक समित्या व शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काठिण्य पातळीची चाळणी लावून प्रश्नपत्रिका निश्चित केली जाते. तरीदेखील बोर्ड परीक्षेत अशा चुका होतातच कशा? असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने त्या विद्यार्थी व पालकांमध्ये प्रश्नपत्रिकेतील गोंधळाची धास्ती वाढली आहे.

प्रवेश व शैक्षणिक नुकसानीचा धोका

अनेक विद्यार्थी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी सीईटी परीक्षेवर फोकस करत असल्याने बोर्ड परीक्षेतील गुणांचे निकष पूर्ण होत नाहीत. या वर्षीपासून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाची गुणवत्ता यादी 50 टक्के सीईटीतील गुण व 50 टक्के बोर्ड परीक्षेतील गुण या निकषांवर तयार केली जाणार आहे. अशा प्रश्न पत्रिकेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेतील गोंधळाचा फटका बसून शैक्षणिक नुकसानीचा धोका संभवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news