सातारा : बाजारपेठेत आवाज फक्त बाप्पांचाच
सातारा; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या स्वागतासाठी पूजा व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी रविवारपासूनच सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत महिला व नागरिकांची गर्दी झाली होती. बुधवारी प्रतिष्ठापनेदिवशी तर शहरातील प्रमुख रस्त्यांना यात्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही काळ व्यत्यय आला होता. मात्र, आता पुन्हा बाजारपेठ वर्दळली असून भक्तांचा उत्साह दुणावला आहे.
गणेशभक्तांच्या खरेदीत व्यत्यय
महिला व नागरिकांच्या गर्दीमुळे पोवईनाका, राजवाडा, मोती चौक, राजपथ, खणआळी, सम्राट चौक सदाशिव पेठ, एसटी स्टँड परिसरात वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांबरोबर वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. बुधवारी सायंकाळनंतर पावसामुळे अनेक गणेश भक्तांच्या खरेदीत व्यत्यय आल्याचे दिसून आले.
मोत्यांचे हार, मखर, दिव्यांच्या माळा अन् बरंच काही
गणेशोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सातारा शहर व परिसरातील बाजारपेठ विविध साहित्यांनी गजबजून गेली आहे. विविध रंगीबेरंगी माळा, मोत्यांचे हार, मखर, दिव्यांच्या माळा, विविध रूपी गणेशमूर्ती व गौरीचे आकर्षक मुखवटे, सोन्या- चांदीची आभूषणे, पूजा साहित्य, विविध प्रकारचे धूप, अगरबत्ती अशा साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. बुधवारी सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी सकाळपासूनच महिला व नागरिकांनी गर्दी केली होती. पोवईनाका, राजवाडा, मोतीचौक, राजपथ, खणआळी, बॉम्बे रेस्टारंट, मंडई परिसरासह अन्य ठिकाणी गणपतीसाठी लागणारे सजावट साहित्य व गणेशमूर्ती, गौरी मुखवटे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत. हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत.
रेखीव नक्षीकामाला गणेशभक्तांची मागणी
स मूषक रथ सजावट, सिंहासन सजावट, वॉटर फॉल सिंहासन सजावट यासह विविध प्रकारच्या दर्जेदार आणि उत्तम रंगसंगतीमध्ये व रेखीव नक्षीकाम केलेल्या साहित्यांना गणेशभक्तामधून चांगली मागणी होती. याशिवाय विविध फुलांच्या माळा, पडदे, रंगीबेंरगी विद्युत माळा यासह विविध साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरले होते. बाजारपेठेत झेंडू, गुलाब, शेवंती, गुलछडी यासह विविध फुलांना चांगली मागणी होती.
- गणपतीच्या सजावटीतील लहान वस्तूपासून ते त्याच्या आभूषणांपर्यंत ग्राहकांकडून मागणी असते.
- गणपतीच्या आभूषणांमध्ये रत्नजडित मुकुट, जानवे, हार, जास्वंदाचे फूल, हातातले कडे तर पूजा साहित्यामध्ये दूर्वा, जास्वंदाच्या फुलाचे हार, कमळ, नारळ, शमीची पाने, तोरण, पाच फळांचे सेट, तबकडी, पंचपात्रे, चांदी व सोन्याची आभूषणे येतात.
- चांदीच्या दागिन्याचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे.
- कोरोनामुळे सुमारे अडीच वर्षे छोटे विक्रेतेही अडचणीत आले होते. यंदा मात्र सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

