सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेत ‘परिवर्तन’

सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेत ‘परिवर्तन’
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकत्र आलेल्या बलवंत पाटील, उदय शिंदे, संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने शिक्षक संघाचा 17-4 असा दारुण पराभव केला. सत्ताधारी शिक्षक संघाचा झेंडा उतरवून विरोधकांनी सत्तांतर घडवून आणले. या परिवर्तनात माजी चेअरमन बलवंत पाटील हे खर्‍याअर्थाने किंगमेकर ठरले. निवडणूक लागल्यापासून त्यांनी विरोधकांना एकत्रित करत पॅनेलची मोट बांधली होती. या विजयानंतर परिवर्तन पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत 21 जागांसाठी सभासद परिवर्तन पॅनेल, शिक्षक संघाचे सभासद विकास पॅनेल आणि स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत 59 उमेदवार रिंगणात होते. अनेक ठिकाणी फाटाफूट आणि बंडखोरी झाल्याने निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. बँकेसाठी शनिवारी 94.88 टक्के मतदान झाले. गत निवडणुकीपेक्षा किंचित कमी मतदान झाल्याने संघाची सत्ता अबाधित राहणार की सत्तांतर होणार, अशी चर्चा होती. रविवार, दि. 20 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणीस प्रारंभ झाला. मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यास दोन तासांचा कालावधी गेल्याने प्रत्यक्ष मतमोजणी 10 वाजता सुरू झाली. यानंतर हळू हळू निकाल समोर येवू लागले.

कराड मतदारसंघात शिक्षक संघाचे महेंद्र जानुगडे यांचा 316 मतांनी विजय झाला. जानुगडे यांना 696 मते मिळाली. तर शिक्षक समितीचे संजय नांगरे यांना 380 मते मिळाली. तर अपक्ष नितीन नलवडे यांना 49 मते मिळाली. नागठाणे मतदार संघात शिक्षक समितीचे विशाल कणसे यांचा 158 मतांनी विजय झाला. कणसे यांना 391 मिळाली. तर शिक्षक संघाचे तुषार घाडगे यांना 233 आणि स्वाभिमानीचे राजेश शिंगाडे यांना अवघी 14 मते मिळाली. आरळे मतदारसंघात शिक्षक संघाचे नितीन राजे यांना 27 मतांनी विजय झाला. राजे यांना 293 तर समितीचे मनोहर माने यांना 265 मते मिळाली. स्वाभिमानीचे गणेश दुबळे यांना 23 मते मिळाली. परळी मतदारसंघात समितीचे तानाजी कुंभार यांचा 14 मतांनी विजय झाला. कुंभार यांना 213 तर संघाचे विश्वास कवडे यांना 65 व स्वाभिमानीचे जोतिराम जाधव यांना 31 मते मिळाली. जावली मतदारसंघात शिक्षक संघाचे विजय शिर्के यांचा अवघ्या 4 मतांनी विजय झाला. त्यांना 326 तर समितीचे शामराव जुनघरे यांना 322 मते मिळाली. महाबळेश्वर मतदारसंघात समितीचे संजय संकपाळ 168 मतांनी विजयी झाले. त्यांना 216 तर स्वाभिमानीचे सुशांत मोतलिंग यांना 48 मते मिळाली.

वाई मतदारसंघात समितीचे नितीन फरांदे यांचा 73 मतांनी विजय झाला. त्यांना 413 तर संघाचे राहूल हावरे यांना 341 मते मिळाली.
खंडाळा मतदारसंघात समितीचे विजय ढमाळ हे 109 मतांनी विजयी झाले. त्यांना 307 तर संघाचे दशरथ ननावरे 198 मते मिळाली.
फलटण मतदारसंघात समितीच्या शशिकांत सोनवलकर यांनी 62 मतांनी विजय मिळवला. त्यांना 272 तर संघाचे लक्ष्मण शिंदे यांना 210 मते मिळाली. स्वाभिमानीचे राजेश बोराटे 155 व अपक्ष विजय भोसले यांना 30 मते मिळाली. गिरवी/तरडगाव मतदारसंघात समितीचे राजेंद्र बोराटे हे केवळ 5 मतांनी विजय झाले. त्यांना 299 तर संघाचे सचिन खराडे यांना 294 मते मिळाली. अपक्ष नितीन करे यांना फक्त 3 मते मिळाली. कोरेगाव मतदारसंघात समितीचे नितीन शिर्के हे 121 मतांनी विजयी झाले. त्यांना 333 मते मिळाली. तर संघाचे अरूण घोरपडे यांना 202 मते मिळाली. रहिमतपूर मतदारसंघात समितीचे सुरेश पवार यांनी अवघ्या 4 मतांनी विजय मिळवला. त्यांना 254 तर संघाचे पृथ्वीराज गायकवाड यांना 250 मते मिळाली. खटाव मतदारसंघात समितीचे नवनाथ जाधव यांनी 138 मतांनी विजय मिळवला. त्यांना 312 तर संघाचे दत्तात्रय गोरे यांना 174 मते मिळाली.

मायणी मतदारसंघात शिक्षक संघाचे शहाजी खाडे यांनी 41 मतांनी विजय मिळवला. त्यांना 236 तर समितीचे आबासाहेब जाधव यांना 195, स्वाभिनीच्या लता बागल यांना 126 मते मिळाली. दहिवडी मतदारसंघात समितीचे संजीवन जगदाळे यांचा 112 मतांनी विजय झाला. त्यांना 309 तर संघाचे महेंद्र अवघडे यांना 197 मते मिळाली. स्वाभिमानीचे आबासाहेब नाळे यांना अवघी 12 मते मिळाली.
म्हसवड मतदारसंघात समितीचे विजय बनसोडे हे अवघ्या 2 मतांनी विजयी झाले. त्यांना 211 तर संघाचे राजाराम तोरणे यांना 209 मते मिळाली. महिला राखीव मतदारसंघात समितीच्या पुष्पलता बोबडे यांनी 4 हजार 751 व निशा मुळीक यांनी 4 हजार 474 मते मिळवून विजय मिळवला. संघाच्या रेखा मोहिते यांना 3 हजार 640, मनिषा रसाळ यांना 3 हजार 443 मते मिळाली. स्वाभिमानीच्या भारती मदने यांना 520 व मनिषा महाडिक यांना 438 मते मिळाली. अपक्ष वैशाली जगताप यांना 28 मते मिळाली. इतर मागास प्रवर्गातून समितीच्या किरण यादव यांनी 1632 मतांनी विजय मिळवला त्यांना 5 हजार 145 तर संघाच्या संतोष शिंदे यांना 3 हजार 513 आणि स्वाभिमानीच्या राहुल नेवसे यांना 451 मते मिळाली.

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात समितीच्या नितीन काळे यांचा 1136 मतांनी विजय झाला. त्यांना 4 हजार 841 मते मिळाली. तर संघाच्या विशाल गिरी यांना 3 हजार 705, स्वाभिमानीचे विजय मदने यांना 533, अपक्ष उमेदवार नितीन करे यांना 27 मते मिळाली.
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून समितीचे ज्ञानबा ढापरे यांचा 1076 मतांनी विजय झाला. त्यांना 4 हजार 820 तर संघाचे किशोर पवार यांना 3 हजार 744, स्वाभिमानीचे गणेश दुबळे यांना 419 व अपक्ष गौतम कोकाटे यांना अवघी 35 मते पडली.

जसजसा निकाल जाहीर होवू लागला तसतसे शिक्षक संघ आणि स्वाभिमानी परिवर्तनच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलातून काढता पाय घेतला. समितीच्या 12 जागा निवडून आल्याचे समजल्यानंतर क्रीडा संकुलाबाहेर समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी रस्त्यावर गुलालाचा सडा पडला होता. याचबरोबर संघाच्या चार विजयी उमेदवारांवरही गुलालाची उधळण करण्यात आली.

पुस्तके एकाकी लढले

प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघाचा अख्खा गट फुटला होता. ज्यांना ज्यांना सिद्धेश्वर पुस्तके यांनी राजकीय पदे दिली, त्यांनीच पुस्तके यांच्यापासून फारकत घेतली होती. त्यातच समितीचे व संघाच्या एका गटाचे अनपेक्षित मनोमिलन झाले. त्याला पुस्तकेंच्याच मुशीत तयार झालेल्या बलवंत पाटील यांची जोरात साथ मिळाली. त्यामुळे पुस्तके एकाकी पडले. आपल्या सगळ्या जवळच्या साथीदारांचे पाच वषार्र्ंत क्रमाक्रमाने सोडून जाणे, ज्यांनी ज्यांनी निवडणुकीच्या काळात ठासून काम करायचे त्यांचे घरी बसणे, निवडणुकीसाठी आवश्यक असणारी रसद नसणे या सर्व बाबी असतानाही सिद्धेश्वर पुस्तके रात्रीचा दिवस करून एकाकी लढत राहिले. शिक्षक बँकेत समिती व संघाच्या एका गटाची सत्ता आली असली तरी सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या 4 जागा अवघ्या 4 ते 5 मतांनी पडल्या आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news