सातारा : ‘पुढारी’मुळे अल्पवयीन मुलांना सुसंस्काराची शिदोरी

सातारा : ‘पुढारी’मुळे अल्पवयीन मुलांना सुसंस्काराची शिदोरी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरासह जिल्ह्यातील बालगुन्हेगारी कमी होऊन मुलांंमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी झाली पाहिजे. यासाठी 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त टीम 'पुढारी'ने बाल निरीक्षण गृह सातारा कार्यालयातील मुलांना शेकडो पुस्तकांचे केलेले दान कौतुकास्पद आहे. 'पुढारी'च्या या मोहिमेमुळे अल्पवयीन मुलांना सुसंस्काराची शिदोरी मिळणार असून, ही पुस्तके वाचून बालगृहाचे व स्वत:चे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. दरम्यान, पुस्तकदान उपक्रम 'पुढारी'कारांचा प्रबोधनाचा वारसा पुढे नेणारा असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

जिल्ह्यातील बालगुन्हेगारी विरोधात दि. 1 जानेवारीला वर्धापनदिनी दै.'पुढारी'ने युवकांच्या डोक्यात चांगले विचार येण्यासाठी सातारकरांना पुस्तके देण्याचे आवाहन केले होेते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर मिळालेल्या शेकडो पुस्तकांचे दान 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी शनिवारी येथील बालगृहात देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक समीर शेख बोलत होेते. प्रारंभी सातारा कार्यालयात 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बालगृहात पुस्तके वाटप उपक्रम पार पडला. यावेळी 'पुढारी'चे विभागीय व्यवस्थापक जीवंधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर, बालगृहाचे संचालक शरद काटकर, बालगृहाच्या अधीक्षक संजीवनी राठोड, पोनि संजय पतंगे, पोनि विश्वजीत घोडके उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, दै. 'पुढारी'च्या सातारा टीमने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली असून सदृढ समाज निर्मितीत 'पुढारी'चे योगदान मोलाचे राहिले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये फोफावणार्‍या गुन्हेगारी विरोधात सुरु केलेली मोहीम पोलिस दलासाठीही दिशादर्शक ठरली. या मोहिमेने सातत्याने पोलिस प्रशासनाला प्रोत्साहीत केले. त्यातूनच आम्ही अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी 'उंच भरारी' हा उपक्रम हाती घेतला असून, त्या माध्यमातून बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करुन देत आहे.
शरद काटकर म्हणाले, 'पुढारी' परिवाराने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अनाथ मुलांच्या हातात थोर व्यक्तींची चरित्र असणारी पुस्तके जात आहेत. त्यातून उद्याच्या भविष्यात चांगले अधिकारी घडतील.

प्रास्ताविकामध्ये हरीष पाटणे म्हणाले, दै. 'पुढारी'चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण 'पुढारी' परिवाराला दिली. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनीही हाच वारसा जोपासत सामाजिक बांधिलकीची परंपरा अबाधित ठेवली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातार्‍यात दै.'पुढारी' समाजाच्या सुख-दु:खाशी समरस असतो. 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी सातारा कार्यालयाकडून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा 'पुढारी' वर्धापनदिनापासून बालगुन्हेगारी विरोधात लढा उभारण्यात आला. अल्पवयीन गुन्हेगारी विरोधात समाजातून उठाव करतानाच अशा मुलांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आम्ही उचलली. समाजाच्या सर्व घटकांनी 'पुढारी'ला साथ दिली. अशा मुलांना संस्कारक्षम पुस्तके देण्यासाठी सातारकरांना वर्धापनदिनी आवाहन करण्यात आले होते. जिल्हावासीयांनी याला भरभरुन प्रतिसाद देत पुस्तके भेट दिली. तीच ही पुस्तके आज बाल निरीक्षण गृह व कारागृहात दिली जात आहेत. पुस्तक वाटपातून अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढेही हा सामाजिक वारसा तेवढ्याच सक्षमपणे पुढे नेणार आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना मान्यवरांनी अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बालकल्याण समिती अध्यक्ष अ‍ॅड. सुचित्रा काटकर, सदस्य स्वरूपा पोरे, जयदीप पाटील, सुनीता पवार, सुजाता देशमुख, चेतन भारती, तुषार सूरत्राण, टीम पुढारी, पोलिस उपस्थित होते.

पोलिसांच्या हातात हात घालून 'पुढारी'ची मोहीम

अल्पवयीन गुन्हेगारीविरोधातील 'पुढारी'चा उपक्रम स्तुत्य आहे. पोलिसांच्या हातात हात घालून 'पुढारी'नेही 'पुस्तकदान' हा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी असून, सातारा 'पुढारी' परिवाराचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असेही जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news