

खटाव; अविनाश कदम : बोर्डाच्या परीक्षांचा माहोल सुरू होत आहे. दहावी, बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करत आहेत. मात्र गावोगावी सुरु असलेले स्पिकर, डीजे, डॉल्बी त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आणत आहेत. देशाचे भवितव्य घडवणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे पालकांसह समाजाचेही कर्तव्य आहे. मात्र सर्वत्र ध्वनीप्रदूषणाचा दणदणाट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे गुणात्मक नुकसान होणार आहे.
येत्या 21 फेब्रुवारीपासून बारावी तर 2 मार्चपासून दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत. आठवडाभराचा कालावधी उरला असल्याने सर्वच विद्यार्थी रात्रीचा दिवस करुन भवितव्य घडवणार्या या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. कोरोना काळात विस्कटलेली शिक्षणाची आणि अभ्यासाची घडी बसवताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना अधिकचे परिश्रम करावे लागत आहेत. त्यातच लॉकडाऊनच्या कालावधीत कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम आता वाढवण्यात आला आहे. परीक्षेची काठिण्य पातळीही अगोदरसारखी करण्यात आली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतानाच गावोगावी स्पिकर, डीजे, डॉल्बीच्या ध्वनीप्रदूषणाने उच्छाद मांडला आहे. कर्णकर्कश आवाजाचा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन करुन सर्वत्र ध्वनिप्रदूषण जोमात सुरु आहे. ग्रामीण भागातील अनेक मंदीरांमध्ये पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकर लावण्याचे फॅड विद्यार्थ्यांच्या अभ्यासात चांगलाच व्यत्यय आणत आहे. डीजे, डॉल्बीचा दणदणाट तर बालकांपासून व्याधीग्रस्त वयोवृध्दांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी अशा ध्वनीप्रदूषणाचा चांगलाच धसका घेतला आहे. काही गावांनी परीक्षा जवळ आल्याने ध्वनिक्षेपक आणि मोबाईल, टीव्ही बंदीचे निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतले आहेत. इतरांनीही अशा गावांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. नेमक्या अभ्यासाच्या पहाटे आणि रात्रीच्या वेळी ध्वनिप्रदूषण टाळले पाहिजे.
ध्वनीप्रदूषण करताना न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या आणि वेळेच्या मर्यादेचे सर्वत्र सर्रासपणे उल्लंघन होते. त्याचा त्रास सर्वांनाच होतो. हे प्रकार थांबवायचे असतील तर पोलिसांचा रोल खूप महत्त्वाचा आणि निर्णायक आहे. मात्र या बाबतीत पोलिसांचीच भूमिका बोटचेपी असल्याचे दिसते. रात्री दहानंतर डॉल्बी, डीजे, स्पिकरचा दणदणाट सुरु राहिला तरी पोलिस बघ्याची भूमिका घेतात हे दुर्दैवी आहे.
डिजे, डॉल्बी, स्पिकरच्या आवाजाची मर्यादा ओलांडून होणारे ध्वनीप्रदूषण समाजातील अनेक घटकांना हानीकारक आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे होतेच होते पण त्या बरोबरच नवजात बालके, वयोवृद्ध तसेच व्याधीग्रस्तांना या ध्वनीप्रदूषणाचा जीवावर बेतणारा त्रास होतो.