परळी; पुढारी वृत्तसेवा : परळी, ठोसेघर, पाटेघर, केळवली या परिसरात पावसाने हाहाकार केला असून, या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावातील रस्ते जलमय झाले आहेत. उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
उरमोडी धरणातील साठा वाढू लागला आहे. पाणी पातळी निर्धारित पाणी पातळीपेक्षा अधिक झाल्यास केव्हाही सांडव्यावरील वक्रद्वारामधून उरमोडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल. तसेच उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ, यांनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असा इशारा उरमोडी धरण विभागाकडून देण्यात आला आहे.
आठवडाभरापासून या परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी आता पावसाने थोडी उघडीप दिली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातच पाणी साठून राहिल्याने शेतीचेही नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कुस बुद्रुक येथे ग्रामपंचायत नजीक असलेली भिंत व ताल पडली आहे. अनेक मार्गांवर मोठ मोठी दगडी वाहून आल्याने रस्ते बंद झाले आहेत. असाच पावसाचा जोर राहिल्यावर रस्त्यातच उपळे निघतील अशीच काहीशी परिस्थती आहे.
उरमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येणार आहे , असा इशारा उरमोडी धरण विभागाकडून देण्यात आला आहे. बुधवारी धरणाची पाणीपातळी 686.97 मी., एकूण पाणीसाठा 154.827 दलघमी म्हणजे 5.46 टीएमसी झाला असून धरण क्षमतेच्या 54.88 टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. यामधील उपयुक्त साठा हा 5.15 टीएमसी आहे. सांडवा माथा पातळी 688.00 मी, पूर्ण संचय पातळी 696.00 मी असून धरण क्षेत्रातील पाऊस 17 मिमी, एकूण पाऊस 391 मिमी झाला आहे. धरणात सध्या पाण्याची आवक ही 4019 क्युसेक होत आहे.