सातारा धावला! … 7 हजारांहून अधिक स्पर्धकांची दौड

सातारा धावला!  …  7 हजारांहून अधिक स्पर्धकांची दौड
Published on
Updated on

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या 11 व्या पर्वात अवघ्या सातार्‍यासह देशातील स्पर्धकही धावले. यावेळी यवतेश्वर घाटात 'हरहर महादेव'चा गजर झाला. रविवारी झालेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह सुमारे 7 हजारांहून अधिक स्पर्धक उत्स्फूर्तपणे दौडले. जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रीयन खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवलेे. 'हम भी किसीसे कम नही' अशा जोशात सातारकर धावपटू दिसले.
कोरोनानंतर सातारा हिल हाफ स्पर्धेबाबत उत्सुकतेचे वातावरण होते. अखेर रविवारी जोशपूर्ण वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल व मॅरेथॉन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेपूर्वी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पहाटे सहाचा ठोका पडल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. सातारा पोलिस परेड ग्राऊंड, पोवईनाका, सयाजी हायस्कूल, नगरपालिका, केसरकर पेठ, अदालतवाडा, समर्थ मंदिरमार्गे धावपटू यवतेश्वर घाटातून निवांत हॉटेलमार्गे, प्रकृती हिल रिसॉर्ट, नित्य साई अमृत रिसॉर्टपासून पुन्हा त्याच मार्गाने पोलिस परेड ग्राऊंडवर आले. हजारो स्पर्धकांमुळे या मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येकजण एकमेकांना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत होते. आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत 7 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्यामुळे रस्ते गजबजून गेले होते. त्यातच नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तुडूंब गर्दी केली होती. या स्पर्धेत 2 वर्षांच्या चिमुरड्यापासून 90 वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांनी या स्पर्धेत धाव घेतली.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंनी आघाडी घेतली होती. स्पर्धेतील अर्धे अंतर चढणीचे असल्यामुळे स्पर्धकांची दमछाक होत होती. मात्र, तरीही उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. एकमेकांना प्रेरणा देत सर्वजण स्पर्धेचे अंतर कापत होते. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करत होते. स्पर्धेत अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला होता. यांचे सातारकरांनी विशेष कौतुक करत त्यांना धावण्यासाठी प्रोत्साहन दिले.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास सातारा रनर्स फौंडेशनच्या रेस डायरेक्टर डॉ. पल्लवी पिसाळ, फौंडेशन अध्यक्षा डॉ. सुचित्रा काटे, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, उपाध्यक्ष डॉ. रंजिता गोळे, सचिव डॉ. आदिती घोरपडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रतापराव गोळे, फाऊंडेशनचे संचालक डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, डॉ. पौर्णिमा गोळे, डॉ. स्वप्ना शेडगे, सीए विठ्ठल जाधव, निशांत गवळी, डॉ. देवदत्त देव, अभिषेक भंडारी, भाग्यश्री ढाणे, राहुल घायताडे, डॉ. राजेश शिंदे, भास्कर पाटील, दिनेश उधाणी, उपेंद्र पंडित, सुधीर शिंदे, निरंजन पिसे, इर्शाद बागवान, संग्राम कदम, कन्हैय्यालाल राजपुरोहित, मंगेश वाडेकर, महेश विभुते, पायल विभुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पारितोषिक वितरण समारंभ सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.'पुढारी'चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर व समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news