कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : गवडी (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन चिमुकल्यांचा सारखळच्या तलावात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसर गलबलला. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्याचा प्रयत्न चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. स्वराज सतीश घोरपडे (वय 11) व सोहम संतोष घाडगे (10) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गवडीच्या प्राथमिक शाळेत स्वराज घोरपडे हा इयत्ता पाचवीत, तर सोहम घाडगे हा चौथीत शिक्षण घेत होेता. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर हे दोघे तसेच संग्राम सोनवणे हे तिघेही चिमुरडे नजीकच्या सारखळ तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. त्यातील स्वराज व सोहम पोहण्यासाठी तलावामध्ये उतरले. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला; मात्र तिघांशिवाय जवळपास कोणीही नव्हते. पाण्यात न उतरलेला संग्राम या प्रकाराने भेदरून गेला. त्याने पळत घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत या परिसरात शेतीची कामे करत असलेल्या शेतकर्यांना ही घटना समजली. त्यांनी तलावाकडे धाव घेत सोहम व स्वराज यांचा पाण्यात शोध घेतला. पाण्यातून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. ग्रामस्थांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. चिमुकल्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. गवडी गाव शोकसागरात बुडाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.