सातारा : जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊ देणार नाही – खा. राजू शेट्टी

सातारा : जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊ देणार नाही – खा. राजू शेट्टी
Published on
Updated on

नागठाणे; पुढारी वृत्तसेवा :  शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना साखर कारखानदारांकडून एफआरपीचे तुकडे केले जात आहे. खतांच्या किमती, डिझेल व मजुरीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच कारखानदारांनी गतवर्षी जाहीर केलेला दर न देता त्यात 100 ते 125 रुपयांची कपात केली. कारखानदारांनी याद्वारे शेतकर्‍यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मेहनतीच्या पैशावर दरोडा घातला आहे. ही जाहीर केलेली एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.

नागठाणे येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, अनिल पवार, रमेश पिसाळ, दादासाहेब यादव, आनंदराव नलावडे, संतोष साळुंखे, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

खा. राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापुरात एकरकमी घेऊन आणखी 200 रुपये जादा मागण्यासाठी लढा सुरू आहे. सातार्‍यात मात्र आहे त्या एफआरपीतच कपात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी किती सोशित आहे हे दिसून येते. यासाठी तुम्ही उठून उभा राहिला तरच मी तुमच्यासाठी लढायला येईन अन्यथा नाही. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीतून भरमसाठ पैसा मिळत आहे. परंतु शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला जात नाही. पण त्यांच्याच एफआरपीमधून पैसे कपात केली जात आहे. गतवर्षी जाहीर केलेला दर कारखान्यांनी दिला पाहिजे. ज्या कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षा 100 ते 125 रुपये कमी दिले आहे. अशा कारखान्यांही कपात तसेच आणखी 200 रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय स्वाभिमानी स्वस्थ बसणार नाही.

मागील एफआरपी शेतकर्‍याला मिळवून देणार आहे. हे पैसे मिळाल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही. होणार्‍या नुकसानीस कारखानदारांचा आडमुठे धोरणच जबाबदार राहिल, असा इशाराही त्यांनी दिला. नवीन नियमांचा हवाला देवून सातार्‍यातील सर्वपक्षीय साखर कारखानदार शेतकर्‍यांना लुटत आहे आणि मुख्यमंत्री शांतपणे बघत आहेत. मागील सरकारने घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय रद्द केले तर शेतकरी हिताचा हा निर्णय का रद्द केला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आले उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा मांडताना व्यापार्‍यांना जुने व नवे आले असा वेगवेगळा दर न देता प्रचलित पद्धतीने दर द्यावा नवीन माळ जुना माल असे चालणार नाही, असेही शेट्टी यांनी ठणकावले.

प्रा. पाटील म्हणाले, उसाला पाच हजार रूपयेही दर दिला जावू शकतो. उपपदार्थांचे योग्य नियोजन करणे त्यासाठी आवश्यक आहे. पण कारखानदार जाणीवपूर्वक याचे नियोजन करत नाही. हे जमत नसेल तर कारखनादारांनी कारखानदारी सोडावी. शेतकर्‍यांची मुले कारखाना चालवण्यास सक्षम आहेत. राजू शेळके म्हणाले, राज्यात सत्तेवर आलेल्या चार पैकी एकाही पक्षाने शेतकर्‍याची बाजू घेवून उसाला भाव मिळावा म्हणून आंदोलने व मोर्चा काढला नाही. यासाठी शेतकर्‍यांनी बुडवणारे कोण व लढणारे कोण? हे ओळखून आपली एकजूट करावी. कारखानदारांनी शेतकर्‍यांची लूट केल्याचे आढळून आल्यास नेते हे लुटणार्‍यांच्या बाजूने की वसूल करणार्‍यांच्या बाजूने हे जाहीर करावे. यावेळी शेतकरी मनोहर साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नागठाणे, अतीत, पाल तसेच शेजारील गावातील शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news