सातारा; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा- जावली मतदारसंघातील ३० पैकी २८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना धूळ चारल्याचा दावा आ. शिवेंद्रराजे भोसले गटाने केला आहे. सातारा मतदारसंघातील १५ पैकी १४ तर, जावली तालुक्यातीलही १५ पैकी १४ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचे सुरुचीवरुन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जावली तालुक्यातील केवळ मोरघर ग्रामपंचायत वगळता बाकीच्या १४ ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रराजे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. रामवाडी, केळघर, रिटकवली, वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींवरही आमदार गटाने एकहाती वर्चस्व राखले. दरम्यान, निवडणूक झालेल्या रुईघर, वालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगवली तर्फ कुडाळ, शिंदेवाडी, आखाडे, कुसूंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींवरही आ. शिवेंद्रराजे गटाने विजय मिळवून विरोधकांना पाणी पाजले.
सातारा मतदारसंघात सोनगाव तर्फ सातारा, भरतगाववाडी, अंबवडे खुर्द, भोंडवडे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून या चारही
ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रराजे गटाने सत्ता मिळवली आहे. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये साबळेवाडी वगळता बाकीच्या १० ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रराजे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. यामध्ये राजापुरी, केळवली- सांडवली, करंजे तर्फ परळी, आसनगाव, बेंडवाडी, जकातवाडी, शहापूर, कोंडवली, माळ्याची वाडी, गोगावलेवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे पत्रकात म्हटले आहे.