सातारा : जागतिक योगदिन उत्साहात साजरा

सातारा : जागतिक योगदिन उत्साहात साजरा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

दीर्घ श्वसन, सूर्यनमस्कार, प्राणायामची प्रात्यक्षिके करत जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनासह विविध शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट व महिला मंडळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय आयुष विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने योगदिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. मानवी आरोग्य व व्यायामाचे महत्त्व, पूरक आहार व सुदृढ जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून योग करण्याचे महत्व पटवून देण्यात आले.

दरम्यान, जागतिक योगदिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग माहिती केंद्रातर्फे स्वयं सेवकांनी सातार्‍यात अनेक ठिकाणी प्रशिक्षकांसह योगाभ्यासाचे धडे दिले. विविध फिटनेस सेंटर, योग प्रसारक संस्था व सामाजिक संस्थांच्यावतीने सातारा शहर व परिसरामध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होतेे. शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालये, विविध सामाजिक संस्थांमध्ये योगा प्रत्यक्षिकांमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवला.

ग्रामीण भागातील शाळांमध्येही विद्यार्थी व पालकांसाठी योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गट व ग्रामसंघांनीदेखील योगदिन साजरा केला. महिलांनी आरोग्याचा जागर करत योगाचे धडे गिरवले. तसेच मागील 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या योग कार्यशाळा व शिबिरांची सांगता जागतिक योगदिनाने करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news