सातारा : पुढारी वृत्तसेवा
कोयनानगर येथील चेंबरी विश्रामगृहाच्या निकृष्ट नूतनीकरणप्रकरणी जलसंपदा विभागाने जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह संबंधित उपअभियंता, शाखा अभियंता व अन्य अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असून चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोयनानगर येथे 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करून चेंबरी विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. चेंबरी उद्घाटन व कोयना धरणग्रस्तांना सातबारे वितरण कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी चेंबरी नुतनीकरण कामावर ताशेरे ओढले होते. अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कोयना प्रकल्पाचे काम पाहणार्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली. नूतनीकरण
कामाच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत यांना दिले होते. याप्रकरणी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी जलसिंचन व कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता डोईफोडे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
कोयनानगर येथील चेंबरी विश्रामगृहाचे जलसंपदा तथा जलसिंचन विभागाने नुतनीकरण केले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश जलसंपदा सचिवांना दिले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे. चेंबरी विश्रामगृह नुतनीकरण कामाच्या सखोल चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची चौकशी व तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका महिन्यात ते चौकशी करुन अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहेत. यामध्ये जे अभियंते दोषी आढळतील त्यांच्याकडून चेंबरी विश्रामगृहाच्या कामावर झालेल्या खर्चाची वसुली केली जाणार असल्याचे सचिव विलास राजपूत यांनी सांगितले.
कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करुन कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सध्या सातारा जलसिंचन कार्यालयातील संबंधित अभियंत्यांची झाडाझडती सुरु झाली आहे. चेंबरी विश्रामृह नुतनीकरणाचे संबंधित काम संगनमताने झाले असून त्याला अभियंते आणि ठेकेदार जबाबदार आहेत. कोयना प्रकल्पाच्या गौरवशाली नावाला गालबोट लावण्याचे काम करु नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. चेंबरी प्रकरणी संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यापासून कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता तसेच संबंधित ठेकेदार कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.