![सातारा : ग्रेडसेप्रेटर हा त्यांचा लहरीपणा – आ. शिवेंद्रराजे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%86-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा; पुढारी वृत्तसेवा : बोटावर मोजण्याइतपत लोक सातार्यातील ग्रेड सेप्रेटरमधून जातात. मी काय तरी करतोय, तेच योग्य आहे. या त्यांच्या लहरीपणातून हे काम झाले आहे. त्यातूनच हा ग्रेड सेप्रेटर सातारकरांच्या माथी मारला आहे. संकल्पक म्हणून नाव लावून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. या प्रकल्पामुळे सातारकरांचा पैसा वाया गेला आहे, अशी टीका आ. शिवेेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंवर केली.
ग्रेडसेप्रेटर भाड्याने देण्यासाठी एका मंडळाने मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे. या मुद्द्यावरून आ. शिवेंद्रराजेंनी टीका केली. आ. शिवेेंद्रराजे म्हणाले, ग्रेड सेप्रेटरबाबत आजपर्यंत सातारकर बोलत नव्हते. मात्र, या मंडळाने या माध्यमातून हा प्रश्न समाजापुढे आणला आहे. मुळात ग्रेड सेप्रेटर सातारकरांच्या माथी मारला आहे. त्यांच्या लहरीपणाचे हे काम असून मी काय तरी करतोय हेच योग्य आहे. यातूनच हा ग्रेड सेप्रेटर झाला आहे. मुळात शाहू चौकातून हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणे गरजेचे होते. कारण सगळ्यांची कामे न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात असतात. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही. बोटावर मोजण्याइतपत लोक दररोज ग्रेड सेप्रेटरमधून प्रवास करतात. केवळ संकल्पक म्हणून फलक लावायचचे आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. इतके मोठे काम असून त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा वाया गेला आहे. सातारकरांसाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. केवळ या उपहासातून त्या मंडळाने ही मागणी केलेली असावी. त्यामुळे त्या मंडळाला सलामच केला पाहिजे.
या प्रकल्पावर वायफळ खर्च झालायं हे या अर्जातून समोर आले आहे. आता या ग्रेड सेप्रेटरच्या रचनेत बदल करता येवू शकतो का
याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. याबाबतचा निर्णय बांधकाम विभागाने घ्यावा, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.