सातारा : गांधी, पवार यांची घराणी प्रायव्हेट लिमिटेड – आ. जयकुमार गोरे

सातारा : गांधी, पवार यांची घराणी प्रायव्हेट लिमिटेड – आ. जयकुमार गोरे

फलटण; पुढारी वृत्तसेवा :  गांधी, पवार यांची घराणी प्रायव्हेट लिमिटेड असून सर्वसामान्य लोकांना हे कधीच मोठे होऊन देत नाहीत. रामराजेंनी आम्हाला भरपूर त्रास दिला. मात्र आता यापुढे 'अभी बोलेंगे नही अब ठोकेंगे', असे खुले आव्हान भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी फलटण येथील सभेत दिले. दरम्यान, संजय राऊत, नवाब मलिक, देशमुख यांच्यानंतर नंबर तुमचाच. खासदारकी किंवा आमदारकी आमच्या दोघांपैकी एकाच्या विरोधात लढवा, तुमची निकाली कुस्ती करु, असे आव्हानही त्यांनी रामराजेंना दिले.

फलटण येथील गजानन चौकात सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अ‍ॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, हणमंत मोहिते, डॉ. जे. टी. पोळ, अशोकराव जाधव, बजरंग गावडे, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. नंदिनी सावंत, उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तो उद्ध्वस्त करुन भाजपने इतिहास रचला. योग्य माणसाला निवडून दिले, मला वेड्यात काढले गेले, कुठं भाजपचा खासदार निवडून येतो? तुम्ही राजकीय आत्महत्या करताय, पण मला सवय आहे इतिहास घडवायची व मी तो घडवला. तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती पद, 14 वर्षे पालकमंत्री पद होते. मात्र चांगला रस्ता नाही, पाणी नाही, पायाभूत सुविधा नाहीत. त्यांनी फक्त आडवाआडवीची कामे केली. खा. शरद पवार, आ. रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीमधील अजून एखाद्याची बेनामी संपत्ती एकत्र केली तर महाराष्ट्राचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज फिटेल, असा टोला आ. गोरे यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, खूप अन्याय झाला. आता कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला की तुम्हाला सोडणार नाही. गोरगरीब लोकांना उद्ध्वस्त केले. कोण स्टेटस वर काय म्हणतंय? तुझ्या बापाला विचार मी काय आहे ते, असे म्हणत विश्वजितराजे छोटा आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. आता कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही. माजी सभापतींना आता दोन-तीन पोलिस गाड्या राहिल्या आहेत. त्याही लवकरच जातील.
यावेळी निलेश चिंचकर, राहुल शहा, शिराजभाई शेख, बाळासाहेब कुंभार, अमित रणवरे, यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविक ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले. आभार अमोल सस्ते यांनी मानले.

जातीचा दाखला असता तर चव्हाण आमदार नसते

मी तालुक्यात ज्या-ज्या वेळी आलो तेव्हा रस्ते खराबच. खंडाळा, फलटणचे हक्काचे पाणी बारामतीला गेले. 2006 सालापासून वितरण व्यवस्था करण्यात आली नाही, एक रुपयांचा निधी दिला नाही, विकासकामे व्हावीत म्हणून बैठका घेतल्या जातात. मात्र तुमच्याकडे एमआयडीसी होऊ नये म्हणून रामराजे यांनी बैठका घेतल्या आहेत. भूमिका घ्या आणि नेतृत्व बदला, चुकून त्यांना जातीचा दाखला मिळाला असता तर दीपक चव्हाण आमदार नसते, असे म्हणत आ. जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर हल्ला चढवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news